नागपूर - ‘वैदिक गणित ही भारताची विशाल परंपरा आहे. वेदांच्या ऋचांमध्येही गणित आहे. ही परंपरा जगासमोर आणण्याचे कार्य झाले पाहिजे. ज्ञानाचा हा खजिना खुला झाला पाहिजे, यासाठी वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र नागपुरात व्हावे, महाराष्ट्र सरकार त्यासाठी आवश्यक ती मदत करेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
जगद्गुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांनी लिहिलेल्या आणि शिक्षा संस्कृतीउत्थान न्यास द्वारे संकलित ‘वैदिक गणित’ आणि ‘वैदिक गणित सूत्र अर्थमॅटिक’ या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले.
वैदिक गणिताचा समावेश राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमातही व्हावा, अशीही अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. गणनेचा संबंध सृष्टीच्या उत्पत्तीशी असल्याचे सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पौराणिक काळातील गणनेशी संबंधित नल-दमयंती आणि महाभारतातील कथा सांगितली. गणित सर्वव्यापी असून ते केवळ आकड्यांचे शास्त्र नाही, असेही ते म्हणाले.
‘माझे गणित कच्चे’
मला गणित जमत नसल्याने दहावीनंतर मी त्याचा पर्याय म्हणून अर्थशास्त्राची निवड केली. त्यावेळी जर वैदिक गणित अभ्यासायला मिळाले असते, तर कदाचित गणित जमले असते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.