इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी विजयी षटकार मारणाऱ्या सूर्यकुमार यादवने मोठा नावावर केला आहे.
या सामन्यात कोलता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स समोर ११७ धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रायन रिकल्टनने अर्धशतक साकारले होते.
त्याने सलामीवीर रोहित शर्मा आणि विल जॅक्ससोबत चांगली भागीदारीही केली होती. हे दोघे बाद झाल्यानंतर रिक्लटनला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आला. तोपर्यंत मुंबई विजयाच्या जवळ होते.
अशात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या. रिकल्टनला तो आल्यानंतर फार काही करायची गरज पडली नाही. तो ४१ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावांवर नाबाद राहिला.
सूर्यकुमारने १३ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर आंद्र रसेलविरुद्ध षटकार ठोकत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सूर्यकुमारने या खेळीदरम्यान टी२० कारकिर्दीत ८००० धावांचा टप्पा पार केला आहे. तो टी२० कारकिर्दीत ८००० धावा करणारा जगातील ३५ वा खेळाडू आहे, तर भारताचा पाचवाच खेळाडू आहे.
त्याच्यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना या भारतीयांनीच ८००० टी२० धावांचा टप्पा पार केला आहे. यातील विराट आणि रोहित आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त झाले असले, तरी आयपीएलमध्ये सक्रिय आहेत. शिखर धवन आणि सुरेश रैना हे मात्र स्पर्धात्मक क्रिकेटमधूनही निवृत्त झाले आहेत.
टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय (३१ मार्च २०२५ पर्यंत)१२९७६ धावा - विराट कोहली (४०१ सामने)
११८५१ धावा - रोहित शर्मा (४५० सामने)
९७९७ धावा - शिखर धवन (३३४ सामने)
८६५४ धावा - सुरेश रैना(३३६ सामने)
८००७ धावा - सूर्यकुमार यादव (३१२ सामने)
सूर्यकुमार यादवने ३१२ टी२० सामन्यांतील २८८ डावात खेळताना या ८००७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ शतकांचा आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे.
यातील ८३ सामने त्याने भारतासाठी खेळताना ७९ डावात २५९८ धावा केल्या आहेत, तर आयपीएलमध्ये त्याने १५३ सामन्यांतील १३८ डावात खेळताना ३६९८ धावा केल्या आहेत. उर्वरित ७६ टी२० सामने त्याने देशांतर्गत स्पर्धेत खेळले असून ७१ डावात १७११ धावा केल्या आहेत.