नेवासे (जि. नगर) - ‘शक्तीविना भक्ती निष्क्रिय असून, भक्तीविना शक्ती विनाशक आहे,’ हे तत्त्व घेऊन स्थापन झालेल्या भक्ती-शक्ती व्यासपीठाच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात इच्छापेटीची स्थापना करण्यात आली. या अनोख्या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या हस्ते विधीवत पूजा करून ही पेटी स्थापित करण्यात आली.
‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने मुंबई येथे आयोजित पादुका दर्शन सोहळ्यात माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी भक्ती-शक्ती व्यासपीठाची स्थापना केली होती. या व्यासपीठाच्या वतीने राज्यभरातील संस्थाने, मुख्य मंदिरांमध्ये इच्छापेटी ठेवण्यात येणार आहे.
धार्मिकस्थळी गेल्यानंतर आपण इच्छा व्यक्त करतो. ती व्यक्तिगत किंवा समाजहिताची असू शकते. इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती आणि भक्तीची गरज असतेच. आपला विश्वास त्या शक्तीवर असतोच. भक्तीच्या माध्यमातून इच्छा पूर्ण करण्याची ताकद मिळते. त्यासाठी इच्छापेटीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.
या इच्छापेटीत संबंधित परिसरातील भाविकांनी आपल्या अडचणी, काही समाजकार्याची आवड असल्यास तशी इच्छा एका ‘फॉर्म’द्वारे टाकायची आहे. त्यावर संबंधित यंत्रणांचा पाठपुरावा भक्ती-शक्ती व्यासपीठाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर मंदिरात इच्छापेटीचे पूजन करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्या हस्ते माऊलींच्या पैसखांबाजवळच्या सभागृहात इच्छापेटीची विधीवत पूजा करण्यात आली. हार, फुले वाहून महिला वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत पेटी स्थापित करण्यात आली.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील अनेक महिला भाविकांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद देत इच्छापेटीत अर्ज भरले. ही पेटी दर महिन्याच्या वद्य एकादशीला उघडली जाणार असल्याचे संस्थानचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे यांनी सांगितले. संस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप, कैलास जाधव, सुरेश ढोकणे आदी उपस्थित होते.
इच्छापेटीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, याबाबत अधिक माहिती हवी असल्यास संत ज्ञानेश्वर मंदिरात अथवा भक्ती-शक्ती व्यासपीठ प्रतिनिधीशी संपर्क साधावा.
- देविदास महाराज म्हस्के, मंदिराचे प्रमुख वेदाचार्य