Maharashtra Live Updates :लोकसभेत मला बोलू दिले जात नाही, राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्षांवर आरोप
Sarkarnama March 27, 2025 12:45 AM
लोकसभेत मला बोलू दिले जात नाही, राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्षांवर आरोप

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर ते बोलू देत नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मी जेव्हा बोलण्यासाठी उभा राहतो त्यावेळी मला बोलण्यापूर्वीच कामकाज तहकूब केले जाते

चंद्रपूर बँक भरतकी घोटळ्याची चौकशी होणार

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या नोकर भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आश्वासन राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.

विधानभवनात बत्ती गुल

विधानसभेचे अधिवेशन चालू असतानाच विधानभवनामधील लाईट गेल्याने गैरसोय झाली. लिफ्ट आणि फॅन काही वेळ बंद होती.

Datta Bharne News : वाशिमचे नवे पालकमंत्री

कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे पद काही दिवसांपूर्वीच सोडले होते. तर भरणे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे वाशिमचा कारभार सोपविण्यात आला आहे.

Kumal Kamra News : कामराविरोधात हक्कभंग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात आज विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला.

Somnath Suryawanshi : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण सीआयडीकडे

सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Santosh Deshmukh Murder Case : आरोपनिश्चितीसाठी करणार अर्ज

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज बीडच्या मकोका न्यायालयात सुनवाणी झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच कोर्टात बाजू मांडली. या घटनेची संपूर्ण माहिती व कागदपत्रे कोर्टाला देण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यासाठी १० एप्रिलाला कोर्टात अर्ज केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar : अण्णा बनसोडेंना गुपचूप तिकिट दिले; अजित पवारांनी सांगितला किस्सा

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे बिनविरोध निवड झाली. अजित पवार यांनी 2019ला अण्णा बनसोडे यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. ⁠मात्र, मी रात्री 2 वाजता गुपचूप जाऊन अण्णा बनसोडे यांना एबी फाॅर्म दिला. ⁠जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते. ⁠अण्णा 17 हजार मतांनी निवडून आले. ⁠

Eknath Khadse : एकनाथ खडसे मंत्री देसाईंवर का भडकले?

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असतानाही महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता. त्यामुळे एकनाथ खडसे हे संतापले. तेव्हा सभापती राम शिंदे यांनी मंत्री शंभुराज देसाई हे सभागृहात येत आहेत, ते वाटेतच आहेत, असे सांगत खडसेंना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शंभुराज देसाई धावत-पळत विधानपरिषदेत आले, त्यावेळी खडसे यांनी त्यांना खडे बोल सुनावले.

Tuljapur Drugs Case : तुळजापूर ड्रग्सप्रकरणात राजकीय कनेक्शन, खासदार निंबाळकरांचे आरोपींबरोबरचे फोटो व्हायरल

मुंबईतून एका महिलेकडून ड्रग्स खरेदी करत तुळजापूर शहरात येणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणाचा राजकीय कनेक्शन समोर आलं असून तुळजापूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे आरोपी असून या दोन्ही आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजप यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची पहिली सुनावणी बीड न्यायालयात झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घटनाक्रम सांगत दोषनिश्चिती करण्याची विनंती न्यायालयाकडे केली. आरोपींच्या वकिलांनी खटल्याच्या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाले नसल्याचे साांगितले. आता पुढची सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे.

Jayant Patil : विरोधी पक्षनेते निवडीसाठी सत्ताधाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; जयंत पाटील यांची विधानसभा अध्यक्षांना विनंती

विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित झाले आहे. सभागृह संपण्यापूर्वी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी यावर चर्चा करा. घटनेचा सन्मान करावी. सत्ताधाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या खटल्याची कागदपत्र मिळाली नाहीत, दोषनिश्चिती करू नका; आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद

संतोष देशमुख हत्येच्या तपासातील आणि न्यायालयात दाखल केलेली कागदपत्र मिळाली नाही. त्यामुळे दोषनिश्चिती करू नये, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी बीड न्यायालयात केली. न्यायालय सरकारी आणि आरोपी पक्षांकडील युक्तिवाद संपल्याने आजच्या दिवसाची सुनावणी संपली.

Santosh Deshmukh murder case : उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्येच्या खटल्याच्या पहिल्या सुनावणीत केला युक्तिवाद

बीड संतोष देशमुख खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद सुरू केला आहे. खंडणी प्रकरणात आडवे येत असल्यानेच संतोष देशमुख यांची हत्या झाली. विष्णू चाटेच्या कार्यालयात सर्व आरोपींची बैठक झाली. या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली.

BJP News: मोदींच्या दौऱ्यामुळे भाजपच्या आमदारांचं प्रशिक्षण रद्द

भाजप आमदारांच दोन दिवसांचं प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. 27 आणि 28 मार्च रोजी हे प्रशिक्षण होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौ-यामुळे शिबिर रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूर दौरा आहे. येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मतदारसंघातील विकासाबाबत आमदारांना मार्गदर्शन करण्यात येणार होते

Anna Bansode Elected Maharashtra Assembly Deputy Speaker: विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोड बिनविरोध

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार अण्णा बनसोडे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीतून त्यांचाच अर्ज आला होता. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदार संघातून ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते.

Pune News :शिक्षणमंत्री भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांनी वार्षिक परीक्षा घ्याव्यात, असे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, त्यावर शिक्षक, मुख्याध्यापकांसह पालकांनी सुध्दा आक्षेप घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक चांगलेच गोंधळात असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही चौकांमध्ये शिक्षणमंत्री भुसे काका, लाडक्या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा, अशा अशयाचे बॅनर युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी लावले आहेत.

Thackeray Shiv Sena Leaders Resign: महिला शिवसैनिक शिंदे गटात

पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक करणार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहेत. आज संध्याकाळी मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे.

Snehal Jagtap Join NCP: स्नेहल जगताप आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या स्नेहल जगताप आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

Supreme Court News : मोठ्या संख्येने झाडे तोडणे म्हणजे माणूस मारण्यापेक्षा वाईट : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाने झाडे तोडण्याची परवानगी मागितल्यावरून खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाने मोठ्या संख्येने होत असलेल्या वृक्ष तोडीवर आपले मत नोंदवले आहे. रेल्वेने रेल्वेच्या विस्तार प्रकल्पासाठी 15941 झाडे तोडण्याची परवानगी होती. त्यावरून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना, झाडे तोडणे हे पर्यावरणाला दीर्घकालीन हानी पोहोचवणारे असून झाडे तोडणे म्हणजे माणूस मारण्यापेक्षा वाईट असल्याचे म्हटलं आहे.

BJP News : भाजपाची मुस्लिमांसाठी ‘सौगात-ए-मोदी’ मोहीम!

भारतीय जनता पक्षाच्यावतीने ईदनिमित्त गरीब मुस्लिमांना भेट दिली जाणार असून जवळपास 32 लाख मुस्लिम कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी’ दिली जाणार आहे. यामधून अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने किट्स वाटप 3 हजार मशिदींमधून करण्यात येणार आहे.

Uddhav thackeray shiv sena crisis News : ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा धक्का! सांगलीतील पदाधिकारी पक्ष सोडून जाणार शिंदेंच्या सेनेत

सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाला उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. येथे जिल्हाप्रमुखांसह ठाकरे गट शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar : 'सध्या नवा ट्रेंड!, नेत्यांचे पाय पडले जातात, पण ते त्या लायकीचे...'; अजित पवारांनी पुढाऱ्यांची लायकीच काढली

सध्या समाजात नवा ट्रेंड पाहायला मिळत असून लोक आई-वडिलांच्या पाया पडण्या ऐवजी नेते पुढाऱ्यांचे पाय पडतात. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. तर लोक ज्यांचे पाय पडतात ते त्या लायकीचे नाहीत, असे म्हटलं आहे. यामुळे सध्या अजित पवार यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Beed Santosh Deshmukh Case News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (ता.२६) सुनावणी होणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये पोहोचले असून सुनावणी 11.30 वाजता होणार आहे. पण त्याआधी शासकीय विश्रामगृह इथं संतोष देशमुख यांचे कुटुंबीय निकम यांची भेट घेणार आहेत.

IAS officers transferred News : पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठ आता पुन्हा एकदा बदल्यांचे आदेश निघाले असून पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढत प्रशासनातील खांदेपालट करण्यात आले आहे. यामध्ये 2020 बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्यात आलं आहे. त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.

Kunal kamra News : कुणाल कामराला पोलिस बजावणार दुसऱ्यांदा समन्स

कुणाल कामराला पोलिसांनी चौकशीला हजार राहण्यासंदर्भात एक समन्स बजावला होता. मात्र तो चौकशीला हजर झालेल्या नाही. यामुळे त्याला खार पोलीस दुसऱ्यांदा समन्स बजावणार आहेत.

maharashtra news Live : राज्यात उन्हाचा तडाखा, अवकाळी पावसाचा फटका

राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा वाढला असून अंगाची लाही लाही होत असून अनेक भागांमध्ये उन्हाचा जोर दिसून येत आहे. अशातच कोकणासह (सिंधुदूर्ग, रत्नागिरी), पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे.

Leader of the Opposition News : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी मिळणार का विरोधी पक्ष नेता?

महायुती सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले असून शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षाची घोषणा होईल. अण्णा बनसोडे यांच्या नावाची घोषणा होणार असून राज्याला विरोधी पक्ष नेता मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबात भास्कर जाधवांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Kunal kamra : तुफान राडा, पुन्हा गाणं! शिवसेनेचा थेट इशारा, 'मुंबईतच काय महाराष्ट्रात शो होवू देणार नाही'

कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे गाण्याने राज्यातील राजकीय वातावरण तापवलं आहे. या प्रकरणामुळे शिवसेना चांगलीच खवळली असून ज्या हॅबिटॅटमध्ये कुणाल कामरा याचा शो झाला त्याची तोडफोड केली. यानंतर पुन्हा एकदा त्याने कंगाल होणार असं गाणं तयार करून शिंदे गटावर आव्हानच दिलं आहे. यावरून शिवसेना नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामराला इशार दिला आहे. तर या पुढे मुंबईच काय महाराष्ट्रात कुणाल कामराचा शो होवू देणार नाही, असे म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.