भिवंडी, ता.२६ (वार्ताहर)ः अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या मानकोली अंजुर फाटा ते चिंचोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी देखील एका खासगी कंपनीकडून टोलवसुली केली जात असल्याने वाहनचालकांसह स्थानिक त्रस्त झाले आहेत.
मानकोली, अंजूरफाटा, खारबाव, चिंचोटी मार्गावर बांधा वापरा हस्तांतरित करा, या नियमानुसार बनवण्यात आला. तेव्हापासून हा रस्ता विविध कारणांनी चर्चेत आहे. नादुरुस्त रस्त्यावर झालेल्या अपघातांमुळे एकीकडे अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे स्थानिकांनी टोल वसुलीविरोधात उग्र आंदोलन केले होते. पण रस्ता काही दुरुस्त झाला नाही. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता ताब्यात घेताना टोल वसुली बंद केली. दरम्यान, शासनाने रस्ते काँक्रिटीकरणासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केले. सध्या ४५ कोटींचा खर्च दुरुस्तीसाठी केला जात आहे. याविरोधात न्यायालयात गेल्याने सुप्रिम कंपनीला शंभर दिवसांच्या टप्प्यात टोल वसुलीची सूट दिली आहे. तसेच व्हीजेएनटी तज्ज्ञांकडून कामाची पाहणी केली जाणार आहे.
-------------------------------------------
स्थानिकांमध्ये संताप
भिवंडीत गोदामपट्टा मोठ्याप्रमाणात असल्याने गुजरात अहमदाबाद व वसई विरारकडून येणारी अवजड वाहने चिंचोटी मार्गे अंजूर फाट्याकडे येऊन पुढे जेएनपीटीकडे जातात. त्यामुळे या महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून टोल वसूल करणाऱ्या कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे.