कोपर रेल्वेस्थानकात सुविधांचा अभाव
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाचे स्टेशनमास्तरांना निवेदन
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : कोपर रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा मिळाव्यात, यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने कोपर रेल्वे स्टेशनमास्तरांची भेट घेत समस्या सोडविण्याची मागणी केली. कोपर रेल्वेस्थानक हे डोंबिवली शहरातील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. येथून वसई, दिवा, पनवेल या मार्गासाठीदेखील लोकल जातात. तसेच मुंबई आणि कसारा-कर्जतच्या दिशेनेही लोकल सुटतात. हजारो प्रवासी रोज येथून प्रवास करतात; मात्र या ठिकाणी कोपर पूर्वेच्या बाजूने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना प्रवास करण्यासाठी लिफ्टची सोय उपलब्ध नाही. तसेच कोपर पूर्वेला तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी उपलब्ध नाही. तिकीट खिडकी उपलब्ध नसल्याने सर्व प्रवाशांना कोपर पश्चिमेला जाऊन तिकीट काढून पुन्हा परत यावे लागते.
कोपर रेल्वेस्थानक बांधून अनेक वर्षे झालेली आहेत; पण या रेल्वेस्थानकावर स्वच्छतागृहाची सुविधा नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची गैरसोय होत असल्याने ठाकरे गटाच्या माध्यमातून वारंवार निवेदन देण्यात आले; मात्र समस्या जैसे थे राहिल्याने पुन्हा निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर कोपर पूर्वेला तिकीट खिडकी, कोपर स्थानकात स्वच्छतागृह आणि कोपर पूर्वेला लिफ्ट सुविधा व्हावी, यासाठी ठाकरे गटातर्फे १७ एप्रिल रोजी कोपर स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, डोंबिवली शहरप्रमुख अभिजित सावंत, उपशहरप्रमुख सुधाकर वायकोळे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी परेश काळण, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपशहर युवा सेना सुदर्शन जोशी, विभाग अधिकारी प्रणव सावंत, विभाग प्रमुख विनायक गोवलकर, उपविभागप्रमुख कुणाल पवार, किशोर सोहनी, विलास नायर, शाखाप्रमुख राकेश राणे, अभय दिघे, मंगेश सरमळकर, शिवसैनिक नारायण गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.