शेअर बाजार मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. आज शेअर बाजाराचं कामकाज सकाळी सुरु झालं तेव्हा सेन्सेक्समध्ये सुरुवातीला 450 अंकांपर्यंत वाढ झाली. निफ्टी 50 देखील पुन्हा एकदा 23600 अकांच्या पार गेल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केल्या जाणाऱ्या चारचाकी वाहनांवर आयात शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देखील भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स 317.93 अंकांच्या वाढीसह 77606.43 वर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांक 105.10 अंकांच्या वाढीसह 23591.95 अकांवर बंद झाला.
विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात खरेदी सुरु केली आहे. हिरो मोटोकॉर्प, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी लाईफ इन्श्युरन्स, ट्रेट, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि विप्रोच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यापासून पुन्हा खरेदी सुरु केली आहे. यामुळं भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. 26 मार्च म्हणजेच बुधवारी सलग पाचव्या दिवशी खरेदीदारांनी 2240.55 कोटींची खरेदी केली. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 11900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विदेशी फंड्सकडून सातत्यानं होत असलेल्या खरेदीनं शेअर बाजारात तेजी दिसून आली.
शेअर बाजारात काही दिवसांपूर्वी आलेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांना काही शेअरचं मूल्यांकन आकर्षक वाटत आहे. ब्लूचिप सेगमेंटमध्ये निचांकी स्तरावर खरेदी करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हीरो मोटोकॉर्प, लार्सन अँड टुब्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये खरेदी सुरु आहे.
जागतिक बाजारात तेजी असल्यानं भारतीय बाजाराला सपोर्ट मिळाला आहे. डाऊ जोन्स फ्यूचर्समध्ये 0.23 टक्के तेजी पाहायला मिळाली. आशियाई बाजारात शांघायच्या एसएसई आणि हाँगकाँगच्या हँग सँग निर्देशांकात देखील तेजी पाहायला मिळाली.
शेअर बाजारातील तेजीची सुरुवात बँकिंगच्या शेअर्सनी केली. विदेशी गुंतवणूकदार परतल्यानं बँक निफ्टी निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढला. बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या शेअरमध्ये तेजी आल्यानं ऑटो शेअरमध्ये झालेली घसरण भरुन निघाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवड्यापासून विदेशातून करण्यात येत असलेल्या चार चाकी वाहनांच्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानं शेअर बाजारात टाटा मोटर्सचे शेअर 5 टक्क्यांनी घसरले. जियोजित इन्वेस्टमेंटसचे आनंद जेम्स यांनी निफ्टी 50 ला 23300 सपोर्ट मिळाल्याचं म्हटलं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..