पुणे, ता. २७ : ‘‘तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही हरत नाही किंवा जिंकतदेखील नाही, तर तुम्ही कायम शिकत राहता. म्हणूनच तुमच्या शिक्षणाला कधीही कमी लेखू नका. सतत शिकत राहा, आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका, तुम्ही अद्वितीय आहात, हे नेहमी लक्षात ठेवा,’’ असा सल्ला भारतीय गायिका उषा उत्थुप यांनी दिला.
लवळे येथील सिंबायोसिस वैद्यकीय महिला महाविद्यालयातर्फे ‘सूर ताल’ या कला सादरीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन उषा उत्थुप यांच्या हस्ते झाले. या वेळी सिंबायोसिसचे वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर म्हणाले की, सिंबायोसिसमधील केंद्र हे बी. जे. मेडिकल कॉलेजमधील कला केंद्राची प्रतिकृती आहे.
सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, संगीताला कोणतीही भाषा नसते, सीमा नसतात. सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस वैद्यकीय महिला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय सागर आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.