मुंबई : भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मते मिळाली होती एक कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७. भाजपची महाराष्ट्रातील आतापर्यंतची सदस्यसंख्या झाली आहे एक कोटी ४४ लाख. ही सदस्यसंख्या लोकसभेतील मतदानापेक्षा जेमतेम सहा लाखाने कमी आहे. ही दरी येत्या सहा दिवसांत ओलांडत राज्यात एक कोटी ५० लाख सदस्यसंख्या गाठण्याचा विश्वास पक्षनेते व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कुठल्याही पक्षाला गाठता आला नव्हता. जवळपास मतांइतकीच सदस्य नोंदणी झाली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वांत विशाल झालेल्या या पक्षाचे सदस्य म्हणून एक कोटी ४४ लाख नागरिकांनी नाव नोंदविले आहे. भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे.
महाराष्ट्रात लोकसभेत असमाधानकारक कामगिरी झाली तरी मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा मिळालेली मते ७७५ ने जास्त होती. विधानसभेत मात्र भरभरून यश मिळालेच शिवाय एक कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते झोळीत पडली. मतदानात मुसंडी मारल्यानंतर राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी ५० लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. महाराष्ट्र प्रदेश भाजपने या उद्दिष्टाची जवळपास पूर्ती केली असून येत्या सहा दिवसांत केवळ सहा लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा दावा नेते करीत आहेत.
नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार?ही मोहीम संपल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सदस्य नोंदणी मोहीम प्रमुख रवी चव्हाण यांना नेमले जाते काय याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.