बिहारमधील अररियामध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका वादातून दिराने आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केली. प्रथम, आरोपी तरुणाने चाकूने महिलेची जीभ कापली. यानंतर त्याने आपल्या वहिनीची चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गीतवास वॉर्ड क्रमांक ११ मध्ये चंडेश्वर मंडलचा मृत महिलेसोबत जमिनीचा वाद सुरू होता. गुरुवारी संध्याकाळी, चंडेश्वर महिलेच्या घरी आला आणि तिच्याशी गैरवर्तन करू लागला. वाद वाढताच, चंडेश्वरने महिलेची जीभ क्रूरपणे कापली. त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केली. मृत महिलेचा पती गिरानंद मंडल यांचे आधीच निधन झाले आहे.
जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे मृताचा मुलगा रविशंकर यांनी सांगितले. कुटुंबाचा आरोप आहे की वादग्रस्त जमिनीवरून बराच काळ तणाव होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमॉर्टमसाठी सदर रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे.
राणीगंज पोलीस स्टेशनचे प्रमुख रवी रंजन सिंह यांनी सांगितले आहे की, सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. महिलेच्या हत्येमुळे कुटुंबातील सदस्यांची अवस्था वाईट आहे, ते दु:खात बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांनी पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.