Hapus Mango : दोन हजार डझन हापूस युरोपला रवाना; 1000 डझन लंडनला; २१०० रुपये दर
esakal March 29, 2025 04:45 AM

राजापूर - गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधण्यासाठी बागायतदार, शेतकरी यांची लगबग सुरू असताना कोकणातील हापूस आंब्याने युरोपवारी साधली आहे. ‘ग्लोबल कोकण’ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा सुमारे दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय चलनाप्रमाणे एक डझन आंब्याला लंडनमध्ये २१०० रूपये दर मिळाला आहे.

कोकणातील हापूस आंब्याला योग्य भाव आणि येथील शेतकरी, बागायतदार यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून हापूस आंबा अभियान राबवण्यात येत आहे. त्यातून, लंडनच्या बाजारपेठेमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे. ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील हापूस आंब्यासाठी येथील शेतकरी, बागायतदार यांना देशी-परदेशी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हापूस आंबा अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी आमदार प्रसाद लाड यांच्यासह लांजा येथील आबिद काजी, रत्नागिरी येथील श्री. कळंबटे, दीपक उपळेकर, दत्तात्रय तांबे, देवगड येथील नरेश डामरी आणि शेतकरी, बागायतदारांनी नियोजन केल्याचे ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी सांगितले.

हापूस आंब्याला लंडनमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तेजस भोसले, सचिन कदम यांनी युरोपमध्ये राहून मार्केटिंगसाठी सहकार्य केले. रत्नागिरी, राजापूर आणि देवगड येथील २ हजार डझन आंबा युरोपला रवाना झाला. त्यातील एक हजार डझन आंबा लंडनमध्ये तर उर्वरित युरोपमधील अन्य देशांत विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.

पुण्यामधून आवश्यक त्या प्रक्रिया करून हापूसचे बॉक्स विमानाने लंडनला पोचले. लंडनसाठी फायटो सॅनटरी सर्टिफिकेट तर युरोपमधील अन्य देशांसाठी उष्णजल प्रक्रिया करण्यात आले होते. आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करूनच हापूस पाठविण्यात आल्याचे यादवराव यांनी सांगितले. लंडनमध्ये हापूसचे पूजन करण्यात आले. सुरवातीला लॅबनॉनमधील वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केटचे केतूल पटेल यांनी ५१ पौंड (भारतीय चलनानुसार ५१०० रुपये) पर डझनने विक्री झाली. सुमारे ११ डझन आंबे त्यांनी विकत घेतले. तर उर्वरित आंब्यांना २१०० रुपये पर डझन असा दर आकारण्यात आला आहे.

हापूसला लंडनमध्ये चांगली मागणी आहे. त्यानुसार कोकणातून हापूस आंबे पाठविले जात आहेत. त्याला दरही चांगला मिळतो. यंदा प्रथम आलेल्या आंब्याचे ग्राहकांनी चांगले स्वागत केले आहे. युरोपिय देशांत हापूसचा प्रचार केला जात आहे.

- तेजस भोसले, लंडन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.