IPL 2025 : राहुल द्रविडच्या एका कॉलमुळे चित्र बदललं! मॅच विजयी खेळीनंतर नितीश राणाने सांगितलं गुपित
GH News March 31, 2025 08:09 PM

राजस्थान रॉयल्सच्या नितीश राणाने आपल्या आक्रमक खेळीने चेन्नई सुपर किंग्सचं कंबरडं मोडलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या नितीश राणा चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांवर तुटून पडला. यशस्वी जयस्वालची विकेट पहिल्याच षटकात गेल्याने दडपण होतं. पण हे दडपण दूर सारून नितीश राणाने जोरदार प्रहार केला. 36 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 5 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 9 गडी गमवून 182 धावांपर्यंत मजल मारता आली. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सला पेलताना कठीण गेलं. विजयासाठी 6 धावा तोकड्या पडल्या आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यातील विजयासाठी नितीश राणाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. खरं तर या सामन्यात नितीश कुमार खेळेल की नाही याबाबत शंका होती. मात्र राजस्थानचे प्रशिक्षक राहुल द्रविडच्या एका कॉलने चित्र पालटलं. आत्मविश्वासाने मैदानात उतरला आणि चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना झोडलं. चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवल्यानंतर नितीश राणाने याबाबत खुलासा केला.

सामन्यानंतर नितीश राणाने सांगितलं की, ‘काल मला राहुल सरांचा फोन आला होता. माझी तब्येत थोडी खराब होती. त्यामुळे मी सरावात भाग घेतला नाही. राहुल सरने सांगितलं की, तुला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. मी कायम आव्हान पेलण्यास तयार असतो. मला यात एक वेगळाच आनंद मिळतो. जर कोणी माझ्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास सार्थकी लावण्याची मजा काही वेगळीच आहे. मला जबाबदारी स्वीकारणं आवडतं.’

‘मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मी स्वत:शी बोललो. मला स्वत:ला समजावलं की कोणती गोष्ट किंवा शॉट आहेत जे मी या सामन्यात आणि टीमसाठी खेळू शकेन. मी स्वत:ला यासाठी प्रोत्साहान दिलं. जेव्हा धावा व्हायच्या असतील तर होतातच. पहिल्या दोन सामन्यातही मी धावा करण्याचा प्रयत्न करत होतो. पण सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अभ्यास केल्याने निश्चितच फायदा होतो.’, असं नितीश राणाने पुढे सांगितलं. फलंदाजीत प्रमोशन मिळाल्यानंतर नितीश राणाने आक्रमक पवित्रा दाखवला. आर अश्विनच्या एकाच षटकात 19 धावा ठोकल्या. तसेच 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.