फडणवीसांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांसह नीरा नरसिंहपूरमध्ये; राजकीय चर्चा रंगत
Marathi March 29, 2025 07:24 PM

इंदापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज  देवेंद्र फडणवीस तुळजापूर, पंढरपूर आणि नीरा नरसिंगपूर दौऱ्यावर आहे. तुळजापूर, पंढरपूर नंतर आता ते इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील त्यांचं कुलदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे नरसिंहपूर येथे दाखल होण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील नरसिंहपूर या ठिकाणी मंदिरात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह दाखल झाल्यानं उपस्थित कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या भुवया उंचावल्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील रिंगणात होते आणि महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांची लढत झाली होती. मात्र, या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र फडणवीसांच्या स्वागतासाठी हर्षवर्धन पाटील उपस्थित राहिल्याने चर्चांणा उधाण आलं.

राजकीय चर्चा होणार नाहीत…

याबाबत प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘आज राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच इंदापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचं लक्ष्मी नरसिंह कुलदैवत आहे. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत,आमचंही ते पिढ्यापिढ्याचं दैवत आहे म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आज सकाळीच मला समजलं की मुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांचा हा खाजगी दौरा आहे देवदर्शन आहे. मला वाटलं की ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांचं स्वागत करायला आपण यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही त्यांच्या कुलदैवाचा तर दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कोणतेही राजकीय चर्चा होणार नाहीत. मी स्वतःच कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते आलेले आहेत मी काय मराठी नेता नाही. आज सगळे जुने मित्र मला भेटले, राजकारणात सगळेच सगळ्यांना भेटत असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. मंदिरामध्ये सगळे जुने मित्र भेटले त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारल्या’, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

हेलिपॅडवर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, दौंडच्या आमदार राहुल कुल, पुरंदर हवेलीचे आमदार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, इंदापूर विधानसभेचे अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.