>> विश्वस वासकर
कोंडीत सापडलेल्या वेदनादायी आयुष्यापासून स्वतवर प्रेम करायला शिकलेल्या स्वायत्त स्त्रीपर्यंत असा मोठा पैस सांभाळणारे स्त्रीवादी साहित्य, ज्यात प्रामुख्याने उल्लेख केला जातो तो सिमन द बो या प्रेंच लेखिकेच्या `द सेकंड सेक्स’ या पुस्तकाचा. स्त्री वादी विचारांची पुरस्कर्ती असणाऱ्या सिमनचे आयुष्यही तितकेच स्वतंत्र आणि वादळी होते. जगण्यावर आणि स्वातंत्र्यावर प्रेम करणाऱ्या सिमनचे विचार आजही तितकेच प्रभावी ठरतात.
फ्रेंच विदुषी आणि ललित लेखिका सिमन द बो यांचा `द सेकंड सेक्स’ (1949) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. तसेच 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दशकाचा प्रारंभ ठरले. याचा मोठा परिणाम जगभरातल्या स्त्रीवादाच्या उद्यावर प्रभाव पडण्यामध्ये झाला. `द सेकंड सेक्स’ पुस्तकाला जगभरातल्या स्त्रीवादाचे बायबल समजले जाते. तिने 1947 च्या सुमाराला हा ग्रंथ लिहिण्याला आरंभ केला आणि 1949 या वर्षी या ग्रंथाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. एकाच आठवडय़ामध्ये या ग्रंथाच्या वीस हजारांवरून अधिक प्रती विकल्या गेल्या आणि जगभर या पुस्तकाने खळबळ माजवायला आरंभ केला.
अगदी फ्रान्समध्येसुद्धा या पुस्तकावर प्रचंड टीका झाली. या पुस्तकाला अश्लील ठरवण्यापर्यंत मजल गेली. तिने या पुस्तकात वापरलेले `योनीमार्ग’, `हस्तमैथुन’, `वीर्यपतन’ हे शब्द वाचकाच्या सहनशीलतेचा अंत पाहणार ठरले. सिमनला जे विचार मांडायचे आहेत किंवा शास्त्रीय विवेचन करायचे आहे, त्याच्या ओघात अपरिहार्यपणे ते आलेले आहेत हे समजून न घेता विरोधकांनी सबंध पुस्तकालाच अश्लील ठरवले. एखाद्या गायनाक्लॉजिस्टला विचाराव्या त्या शंका लोक तिला विचारू लागले. तिच्या देशात गर्भपाताला कायदेशीर परवानगी नव्हती म्हणून असे पुरुष किंवा स्त्रिया तिला गर्भपात करणाऱ्या डॉक्टराची माहिती विचारू लागले. गंमत म्हणजे अशा मानसिक छळामुळे वैतागून न जाता या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर वीस वर्षांनी सिमनने गर्भपाताचा कायदा आणण्यासाठी चळवळ उभी केली.
सिमनचे मोठेपण हे आहे की, तिच्या करणी आणि कथणीमध्ये अजिबात अंतर नाही. एक स्वतंत्र स्त्री म्हणून ती आयुष्यभर जगली. पुरुषप्रधान संस्कृतीशी तिने मुळीच तडजोड केली नाही. एखाद्याबरोबर विवाह करून संसार केला नाही. स्वत:चे घरकुल निर्माण केले नाही. आयुष्यभर हॉटेलमध्ये राहिली. एखाद्या कुटुंबवत्सल स्त्रीला ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टीची तिला मुळीच आवड नव्हती.
प्रसारमाध्यमांमधून प्रचंड विरोध आणि बदनामी झाली तशी काही प्रतिष्ठितांची साथ व पाठिंबाही तिला मिळाला. तिची बहीण हेलन, फ्रान्समधले तिचे मित्र बॉस्ट, क्लॅड लन्झमन, नोबेल पारितोषिक विजेता सार्त्र यांनी तिची बाजू उचलून धरली. तिचा एक अमेरिकन मित्रही होता तोही तिच्या मदतीला धावला. विवाह न करता ती सार्त्रसोबत राहिली. सार्त्र आणि तिचे नाते हा जगभरातला कौतुकाचा विषय झाला.
लेखक आणि विचारवंत सार्त्रवर सिमनचे निरातिशय प्रेम होते व सार्त्रचेही तिच्यावर. या दोघांनाही आपण लग्न केले पाहिजे असे कधीही वाटले नाही. सार्त्र व काफ्का या दोन लेखकांमध्ये प्रतिस्पर्धेची आणि किंचित शत्रुत्वाची भावना होती. सार्त्रला कॅन्सर झाला हे कळण्याआधी तिने काफ्काला विचारले, “हे मी सार्त्रला सांगू का नको?” काफ्का म्हणाला, “तो महान प्रतिभावंत आहे. तू त्याला अनुभवातून जाऊ दे.” या दोघांच्या कॅन्सरच्या संवादाची हकिकत जेव्हा सार्त्रला कळाली, तेव्हा त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले. ही सुंदर आठवण विषयांतर करून सांगणे मला सिमनच्या संदर्भात महत्त्वाचे वाटते.
स्त्री व पुरुष यांच्या जीवनपद्धतीत केला जाणारा भेदभाव, त्यामुळे स्त्रीमध्ये येणारी एक प्रकारची मानसिक दुर्बलता, तिचे आर्थिक परावलंबित्व, विवाह करणे, आई होणे आणि तिच्या एकटीवर घरकाम टाकणे या पुरुषप्रधानतेच्या केंद्रांमुळे स्त्रीच्या विकासावर शेकडो बंधने येतात. आपला संपूर्ण विकास व्हायचा असेल तर स्त्रीने ही सगळी बंधने झुगारून दिली पाहिजेत हा या पुस्तकाचा संदेश आहे. याचा इष्ट परिणाम जगभरातल्या पालकांवर त्यांच्या नंतर जन्मलेल्या मुलीचे योग्य संगोपन करण्यासाठी झाला. या ग्रंथाच्या सुरुवातीला एक साररूपाने वाक्य दिले आहे ते म्हणजे, `स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते.’ या वाक्याचा बोध घेऊन नंतरच्या पिढीतील जगभरातल्या स्त्रियांनी आपल्या मुलीची जडणघडण विपरित मार्गांनी होणार नाही यांची काळजी घेतली. ज्या स्त्री-पुरुषांनी `द सेकंड सेक्स’ वाचले, त्या प्रत्येकाच्या विचारसरणीत संपूर्ण परिवर्तन घडले. दादा धर्माधिकारी यांनी आपल्या लेखनात स्त्रियांनी नटणे, मुरडणे टाळावे असा विचार मांडला होता. आपल्या सामाजिकतेमध्ये एकीकडे स्त्रीच्या सौंदर्याची वारेमाप स्तुती होते आणि त्याचबरोबर तिच्या बौद्धिक व शारीरिक कौशल्याची उपेक्षा केली जाते. निसर्गत: अबला नसलेल्या स्त्रीला स्वतच्या स्वार्थासाठी तसे बनवले आहे.
सिमनच्या विचारांचा भारत देशावर पर्यायाने महाराष्ट्रावरसुद्धा अनुकूल प्रभाव पडला. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना पुरुषांइतकाच समान दर्जा व समान संधी प्राप्त करून दिली. 21 व्या शतकामध्ये भारतात आणि मराठीत स्त्रीवादी साहित्य निर्माण व्हायला लागले. औद्योगिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या रेटय़ामुळे खुद्द स्त्रीचे जीवन आमूलाग्र बदलले. पुरुषाच्या बरोबरीने ती आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र झाली. डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास `कोंडीत सापडलेल्या स्त्रीच्या वेदनादायी आयुष्यापासून स्वतवर प्रेम करायला शिकलेल्या स्वायत्त स्त्रीपर्यंत किती तरी विषय स्त्रीवादी साहित्य हाताळते.’
अलीकडच्या काळात महत्त्वाचे स्त्रीवादी साहित्य लिहिले जात आहे. अमृता प्रीतम, कमला दास, तसलीमा नसरीन हा भारतीय स्त्रीवादी साहित्याचा प्रारंभ बिंदू म्हणता येईल. तसलीमा नसरीन यांची `फरासी प्रमिक’ आणि अंजली जोशी यांची `विरंगी मी! विमुक्त मी’ या सर्वश्रेष्ठ भारतीय कादंबऱ्या आहेत.
मराठीला डॉ. अश्विनी धोंगडे यांच्यासारखा महान समीक्षक लाभला हे मराठीचे भाग्य. मराठीमध्ये अभिमान वाटावी अशी स्त्रियांच्या आत्मचरित्राची परंपरा आहे. यासंदर्भात अश्विनी धोंगडे यांनी मांडलेल्या विचारांनी या लेखाचा समारोप करणे मला आवडेल. `तुलनेने महाराष्ट्रात पुरुष समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे असेल कदाचित, पण मराठीमध्ये स्त्रियांना उदारमतवादी सामाजिक प्रवाहाचा खूपच फायदा झाला आहे. इतर कोणत्याही भाषेत स्त्रियांच्या आत्मचरित्राची एवढी मोठी परंपरा नाही. आत्मचरित्र हा साहित्यप्रकार स्त्री जीवनातल्या स्थित्यंतराचे थेट वास्तव चित्रण करणारा आहे. सहजीवनातील ताणतणाव, विसंवाद, अपेक्षाभंग व स्त्रीत्वाचा शोध, स्वत्वाचा साक्षात्कार, व्यक्तिवादाचा पुरस्कार यांचा अत्यंत धीट आविष्कार हे मराठी आत्मचरित्रांचे खास वैशिष्टय़ आहे.’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)