Sunita Williams : अंतराळातून कसा दिसतो भारत ? सुनिता विल्यम्स म्हणाल्या..
GH News April 01, 2025 02:09 PM

भारतीय वंशाची, नासाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे अंतराळात तब्बल 9 महिने राहिल्यानंतर अखेर 18 मार्च रोजी घरी, पृथ्वीवर परतले. या ग्रहवापसीनंतर त्यानी सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केले आणि अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचे अनुभव सांगितले. अंतराळातून परतल्यानंतर पहिल्या मुलाखतीत सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, आम्हाला घरी आणल्याबद्दल मी नासा, बोईंग, स्पेसएक्स आणि या मिशनशी संबंधित सर्वांचे आभार मानू इच्छिते. आम्हाला पृथ्वीवर परत येऊन जवळपास दोन आठवडे झाले आहेत. आता आम्हाला प्रत्येकजण विचारतोय की तुम्ही काय करताय? आम्ही नव्या आव्हांनासाठी सज्ज झालो आहोत. नव्या मिशनसाठी तयारी करतोय असं सुनिता म्हणाल्या. मी कालच तीन मैल धाऊन आले, त्यामुळे मी नक्कीच स्वत:च्या पाठीवर थाप देऊ शकेन.

घरी परत येण्याची होती खात्री…

आम्ही पहिल्यांदाच नवीन अंतराळयानात होतो. ज्या मोहिमेसाठी आम्ही स्पेस स्टेशनवर गेलो होतो ते पूर्ण करण्यावर आमचे संपूर्ण लक्ष होते. आम्ही अनेक प्रकारचे अवकाश प्रयोग केले. त्यामुळे आपण अवकाशात अडकलो आहोत असे कधीच वाटले नाही, असे सुनिता विल्यम्स म्हणाल्या. पृथ्वीवर काय चालले आहे हे आम्हाला कळतही नव्हते? एक प्रकारे बघायचं झालं तर आम्ही जगाभोवती फिरत नव्हतो, तर जग आमच्याभोवती फिरत होते. अंतराळ स्थानकावर सतत रोटेशन फ्लाईट्स येत होत्या, त्यामुळे आम्ही नक्कीच मायभूमीवर परतू अशी खात्री होती, असे त्यांनी नमूद केलं.

पृथ्वीवर परत पाऊल ठेवलं त्याक्षणी…

तब्बल 9 महिने अंतराळात घालवल्यानंतर 18 मार्चला जेव्हा पृथ्वीवर परत पाऊल ठेवलं तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनात हाच विचार होता की मला माझ्या पतीला आणि पाळीव कुत्र्यांना मिठी मारायची होती, असे त्या म्हणाल्या. अन्न अशी गोष्ट आहे जी आपल्याला घराची आठवण करून देते. माझे वडील शाकाहारी होते, म्हणून मी घरी आल्यावर पहिली गोष्ट खाल्ली ते म्हणजे, एक चविष्ट ग्रील्ड चीज सँडविच.

सुनिता आणि तिचे सहकारी अतराळात अडकल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये विविध बातम्या येत होत्या. त्या नॅरेटिव्हबद्दलही सुनिता बोलल्या, (आम्ही स्पेस स्टेशनवर गेलो) तो एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कार्यक्रम होता.काही गोष्टी चुकीच्या घडू शकतात म्हणून आम्ही त्यासाठी तयार होतो, असे त्यांनी नमूद केलं. अनेकजण कार्यक्रमावर लक्ष ठेवून होते. आम्ही कधी परत येणार हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे आम्ही फक्त त्यांच्या निर्णयाची वाट पहात होतो, असं सुनिता यांनी सांगितलं.

रिकव्हरीवर पूर्ण लक्ष

आपल्या रिकव्हरीबद्दलही त्या बोलल्या. आमच्या रिकव्हरीवर तज्ञांचे पूर्ण लक्ष आहे. पृथ्वीवर परत आल्यापासून आम्ही तज्ज्ञांनी सुचविलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहोत. आमची रिकव्हरीवर हळूहळू होत आहे, असे त्या म्हणाल्या.

आमचं मिशन पूर्ण करून परत यायला वेळ लागला, पण त्यावरून आम्ही योग्य धडा शिकलो आहोत. पुढल्या वेळेस काय करावं किंवा काय टाळावं हे आम्ही त्या चुकांमधून शिकलो, तुम्ही असचं शिकता. चुकांमधून योग्य तो धडा घ्यायचा आणि पुढे जायचं, यानेच आपली प्रगति होते, असं सुनिता विल्यम्स यांनी नमूद केलं. या मिशनमधून आयुष्यभराचे धडे घेतल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीतही आमच्यासमोर एक संधी होती. आम्ही एकही संधी गमावली असे नाही तर मला आणखी एक संधी मिळाली आहे, असे त्या म्हणाल्या.

अंतराळातून कसा वाटला भारत ?

अंतराळातून भारत कसा वाटला त्याबद्दलही सुनिता विल्यम्स मनापासून बोलल्या. भारत अप्रतिम आहे. प्रत्येक वेळी आम्ही हिमालय ओलांडून गेलो तेव्हा बुच विल्मरने हिमालयाची अविश्वसनीय फोटो काढले. अंतराळातून हिमालयाचे दृश्य विहंगम दिसतं. भारताचे खूर रंग आहेत. पू्वेकडून पश्चिमेकडे जाता तेव्हा तुम्हाला तेथील किनाऱ्यांवर मासेमारी करणाऱ्या नौकांचा ताफा दिसतो, तो गुजरात आणि मुंबईच्या आगमनाचे संकेत देतो. दिवसा हिमालय पाहणे आश्चर्यकारक होते. भारतात, मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत दिव्यांचे जाळे दिसते, जे रात्रीच्या वेळी अविश्वसनीय दिसते.मी लवकरच माझ्या वडिलांच्या मायदेशात, भारतात येणार आहे, असं त्यांनी नमूद केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.