म्यानमार आणि थायलंड या देशांत शुक्रवारी (28 मार्च) तीव्र धक्के बसले.
म्यानमारच्या जुंटा सरकारने नुकताच मृतांचा आकडा जाहीर केला आहे. या भूकंपात देशभरात 1600 हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर जखमींचा आकडाही 3408 वर पोहोचला आहे.
भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या मंडाले शहरात 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी नायपिडॉमध्ये 94, क्युक्सेमध्ये 30 आणि सागाईंगमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती.
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड सेंटर फॉर जिओसायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलं आहे.
थायलंडच्या राजधानीत, बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले. तिथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत. तिथं भूकंपानं 6 जणांचा मृत्यू झाला असून, 100 मजूर बेपत्ता आहेत.
अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता 7.7 सांगितली असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने, भूकंप 7.9 तीव्रतेचा असल्याचं म्हटलंय. त्यांनी ही माहिती चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर या चीनमधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतली.
भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडले शहराजवळच्या असल्याचं अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने म्हटलंय.
भूकंपाच्या ताज्या फोटोंमध्ये इरावजी नदीवरचा विशाल पूलही पडल्याचं दिसत आहे. म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या.
थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसल्या. लोक त्यापासून दूर पळत होते.
एका इमारतीतल्या स्विमिंग पूलमधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एका व्हीडिओत दिसलं. या संदर्भात थायलंडच्या सरकारने एक आपत्कालिन बैठकही केली.
भारताने पाठवली मदतम्यानमारमधील भूकंपानंतर भारत 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत याठिकाणी मदत पाठवत आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या माहितीनुसार, 118 सदस्य असलेलं भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट शनिवारी आग्र्याहून मंडालेला रवाना झालं.
हे पथक म्यानमारमधील लोकांना प्रथमोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यास मदत करेल.
भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री जहाजांद्वारे 40 टन साहित्य मदत म्हणून पाठवण्यात आलं आहे.
शनिवारी, भारतातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचं (एनडीआरएफ) 80 सदस्यांंचं पथकही बचाव कार्यात मदत करण्यासाठी म्यानमारला रवाना झाली.
याशिवाय, भारतीय हवाई दलाच्या सी-130 विमानाने ब्लँकेट, ताडपत्र्या, स्वच्छता किट, स्लीपिंग बॅग, सौर दिवे, अन्नाची पाकिटं आणि किचन सेट म्यानमारला पाठवण्यात आले.
भूकंपाचं केंद्र जमिनीच्या किती खोल होतं?बँकॉकमध्ये काम करणाऱ्या बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनीही भूकंप अनुभवला. त्यावेळी इमारती हलताना आणि लोक रस्त्यावर बाहेर येताना दिसले.
भूकंपाचा झटका इतका जबरदस्त होता की, एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून पाणी खाली रस्त्यावर पडताना दिसलं, असं बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील सागँग शहरापासून 16 किमी दूर वायव्य दिशेला मांडले शहराजवळ असल्याचं अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने सांगितलं. हे ठिकाण देशाच्या राजधानीपासून जवळपास 100 किमी उत्तरेच्या बाजूला आहे.
तरीही राजधानीत भूकंपाच्या झटक्यांनी रस्ते दुभंगल्याचं आणि घरांची छतं मोडून पडल्याचं तिथे उपस्थित एएफपीचे पत्रकार सांगत होते.
चायना डेली या वृत्तसंस्थेनुसार, चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर या संस्थेनं भूकंपाचा बिंदू पृथ्वीच्या 30 किमी आत असल्याचं सांगितलंय.
भूकंपाचे झटके नैऋत्य चीनच्या युन्नान प्रांतापर्यंत जाणवल्याचंही सांगितलं जात आहे. म्यानमारच्या इरावजी या मुख्य नदीवरचा एक मोठा पूल कोसळताना काही फोटोंमध्ये दिसला.
म्यानमारमध्ये जिथे भूकंप आला तिथून थायलंडची राजधानी बँकॉक जवळपास 1000 किमी दूर आहे. असं असूनही तिथेही भूकंपाचा जबरदस्त फटका बसला. त्यात एक बांधकाम सुरू असलेली इमारत जमिनदोस्त झाल्याचं सांगितलं जातंय.
त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं पोलीस सांगत आहेत.
म्यानमारच्या भूकंपाचा इतिहासथायलंडच्या तुलनेत म्यानमारमध्ये जास्त भूकंप येतात.
एएफपी न्यूज एजेंसीच्या माहितीनुसार, अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेच्या एका अहवालात असं म्हटलं आहे की, 1930 ते 1956 या कालावधीत सागँग फॉल्टजवळ 7 रिश्टर स्केल तीव्रतेचे सहा भूकंप आले.
हा सागँग फॉल्ट म्यानमारच्या मध्यभागातून जातो, त्यामुळे या भागात भूकंप होण्याची शक्यता अधिक असते.
थायलंड भूकंप-संवेदनशील क्षेत्र नाही आणि तिथं जाणवणारे सगळे भूकंप शेजारील म्यानमारमध्येच होतात असं लक्षात आलं आहे.
बँकॉकमध्ये इमारती बांधताना भूकंपरोधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे भूकंप झाल्यास येथे नुकसान जास्त होऊ शकतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)