विम्याचे पैसे मिळवण्यासाठी बापाने चक्क मुलाच्या मृत्यूचा बनाव रचला. यासाठी बापाला कायदेशीर पेचातून कसं निसटायचं, काय करायचं यासाठी वकिलाने मदत केली. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून बाप-लेकाला अटक केली आहे. दिल्लीच्या नजफगढमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बापाने मुलगा गगनच्या नावे एक कोटी रुपयांचा जीवन विमा केला. यानंतर ५ मार्चला रात्री एक बनावट अपघाताची कहाणी रचली. कथित अपघतात गगनला किरकोळ दुखापत झाली. तिथून रुग्णालयात नेलं. त्यानंतर मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण त्याला कोणत्याच मोठ्या रुग्णालयात नेलं गेलं नाही. काही दिवसांनी वडिलांनी सर्वांना सांगितलं की, त्यांच्या मुलाचा मृत्यू झालाय. घरी अंत्यसंस्कार करण्यात आले. दशक्रियाविधीही केले गेले. यानंतर बापाने विम्यासाठी कंपनीत दावा केला.
दरम्यान, ११ मार्चला एक व्यक्ती नजफगढ पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने सांगितलं की, ५ मार्चला माझ्याकडून एक अपघात झाला होता आणि त्यात एकाचा मृत्यू झालेला. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली पण पोलिसांना अपघाताचा कोणताच पुरावा मिळाला नाही आणि रुग्णालयातून मृत्यूचीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी अधिक चौकशी केली आणि तपासात स्पष्ट झालं की, कोणताच अपघात झाला नाही आणि मृत्यूही झाला नाहीय.
पोलिसांना तपासात असं आढळलं की, गगनच्या मृत्यूच्या दाव्याआधी काही महिन्यांपूर्वीच एक कोटींचा विमा काढण्यात आला होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी कठोर चौकशी सुरू केली.
गगनची विमा पॉलिसी काही महिने आधीच घेतली होती यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. गगन आणि त्याच्या वडिलांनी वकिलाच्या सल्ल्याने एक कोटींचा विमा मिळवण्यासाठी सगळं नाटक रचलं होतं. पण पोलिसांनी खोट्या कहाणीचा पर्दाफाश केला. आता बापलेकाला अटक केली असून वकिलाची यात काय भूमिका होती याची चौकशी केली जात आहे.