आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे मागच्या वर्षासारखंच होतेय की अशी शंका क्रीडाप्रेमींना वाटू लागली आहे. मुंबई इंडियन्स खेळाडूंमध्ये आक्रमकता आणि विजयाची भूक दिसत नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आता मुंबई इंडियन्स तिसरा सामना घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सशी हा सामना होणार आहे. कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईकर असल्याने त्याला या मैदानाची चांगली जाण आहे. त्यामुळे हा सामना वाटतो तितका मुंबईसाठी सोपा नसेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर स्पर्धेतील कमबॅक हळूहळू कठीण होत जाईल. त्यात स्टार गोलंदाजी जसप्रीत बुमराह नसल्याने मुंबई इंडियन्सचं अजून कठीण झालं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध 196 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स 160 धावांपर्यंतच मजल मारू शकली. तसेच 36 धावांनी पराभव सहन करावा लागला. गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या काही अंशी वैतागलेला दिसला. त्याने या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरलं. तसेच अप्रत्यक्षरित्या ताकीदही दिली.
हार्दिक पांड्या म्हणाली की, ‘मला वाटते की फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी आम्हाला 15-20 धावा कमी पडल्या. आम्ही मैदानात प्रोफेशनल नव्हतो, आम्ही साध्या चुका केल्या आणि त्यामुळे आम्हाला 20-25 धावा गमवाव्या लागल्या आणि टी20 सामन्यात ते खूप जास्त आहे. गुजरातच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.’ हार्दिक पांड्याने पुढे म्हणाला की, त्यांनी पॉवरप्लेमध्येही चांगल्या धावा केल्या. पण आमच्या फलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही.
‘सध्या आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे, अजूनही सुरुवातीचा टप्पा आहे. फलंदाजांना लय मिळवायची आहे, आशा आहे की ते लवकरच ते करतील.’ हार्दिक पांड्याने अप्रत्यक्षपणे आघाडीच्या फलंदाजांना सुनावलं आहे. दोन्ही सामन्यात आघाडीचे फलंदाज निष्फळ ठरले. मुंबई इंडियन्सकडून सलामीला आलेला रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खातं खोलू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात पहिल्याच षटकात फक्त 8 धावा काढून क्लीन बोल्ड झाला. 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंड्याचा संघ विजयाचे खाते उघडेल का हे पाहणे बाकी आहे.