पुणे : महाराष्ट्रावर आजमितीला आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर दुसरीकडे राज्यकर्ते मते मिळवण्यासाठी करदात्यांचे पैसे वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे(फ्रीबीज) उधळपट्टी करत आहेत. जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे. हा सगळा आपलाच पैसा आहे. तो अशा कारणांसाठी खर्च करण्याऐवजी कल्याणकारी योजनांसाठी खर्च करायला हवा. तर भारत विकसित होण्याच्या वाटेवर राहू शकतो असे प्रतिपादन वैज्ञानिक, लेखक, आणि राजकीय विश्लेषक आनंद रंगनाथन यांनी केले.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे व वि.का. राजवाडे सभागृहाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी रंगनाथन यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी ‘विकसित भारत २०४७ ः संधी व आव्हाने’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, उपाध्यक्ष बी.डी. कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम, मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
रंगनाथन यांनी यावेळी भारताचा इतिहास, न्यायव्यवस्थेतील अनास्था, बेरोजगारी, नोकरशाहीतील भ्रष्टाचार, बदलते आरोग्य, राजकीय धोरणे व त्याचे समाजावरील झालेले परिणाम, शेती व शेतकऱ्यांची दुरवस्था व गेल्या दहा वर्षांतील झालेला विकास व चुकलेले धोरणे यांची समीक्षा केली. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. याच बँका राज्यकर्त्यांकडून ‘कॅश काऊ म्हणून वापरल्या जात आहेत. त्यांचा कोटयावधी रूपयांचा ‘एनपीए’ वाढत आहे. न्यायव्यवस्थेबाबत ते म्हणाले की देशात इतके खटले प्रलंबित आहेत की त्यांना निवाडा करण्यासाठी ३३ वर्षे लागतील. न्यायवस्थेतील भ्रष्टाचारही समोर आला आहे. १० टक्क्यांच्या व्यतिरिक्त इतर न्यायाधीश त्यांची संपत्ती जाहीर करत नाहीत.
राज्यांची भूमिका ही कल्याणकारी, आरोग्यदायी धोरणे अवलंबणे हा आहे. आपल्याकडील धोरणे हे आर्थिकदृष्टया कल्याणकारी वाटत असले तरी ते सामाजिकदृष्ट्या कल्याणकारी नसल्याचे सांगत आजही ३४ टक्के बालके कुपोषित आहेत. २० टक्क्यांना लसीकरण मिळत नाही. ४४ टक्के लोकसंख्या ही शेतीत राबते परंतु, त्यांचा विचार केला जात नाही. शेतकऱ्यांचा माल साठवण्यासाठी पुरेसे गोदाम नाहीत. गेल्या दहा वर्षांत १ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्याविषयी कोणी काही बोलत नाही. दुसरीकडे एका आयटी कर्मचा–याने आत्महत्या केली तरी त्यावर चर्चा झडतात, असे रंगनाथन यांनी स्पष्ट केले. तर, ३० वर्षांपूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण ७० टक्के तर असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण ३० टक्के होते. ते आता उलट झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पांडुरंग बलकवडे यांनी मंडळाचे भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. रावत यांनी प्रास्ताविकाद्वारे नव्या पिढीला इतिहासाची आवड लागावी यासासाठी अनुकूल अशा सुविधा मंडळाने तयार केल्याबाबत माहिती दिली. मंडळाच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्यासाठी चार कोटी रुपयांची देणगी देणारे उद्योजक व मायदेश फाउंडेशनचे अरुण जोशी व त्यामध्ये योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले.