शिवेसना नेते, खासदार संजय राऊत यांना दोन वर्षांपूर्वी ईडीने एका प्रकरणात अटक केली होती. काही महिने ते आर्थर रोड कारागृहात होते. तुरुंगात असताना आलेले अनुभव संजय राऊत यांनी शब्दबद्घ केले आहेत. लवकरच त्यांचं ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्याविषयी संजय राऊत आज पत्रकार परिषदेत बोलले. “आर्थर रोडमधील अनुभव आहेतच. पण त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रातील काही टुकार नेते यांनी ईडी सीबीआय यांना हाताशी पकडून, त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीने आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला” त्या बद्दल या पुस्तकात लिहिलं आहे.
“त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना छळण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना त्रास दिला, तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे? या सर्वांचं काय झालं? आमच्यासारख्यांना तुरुंगात टाकलं. कोर्टाने सुटका केली. याचे अनुभव आहेत. तुरुंगात टिपणं केली. त्याचं पुस्तक यावं असं सहकाऱ्यांचं म्हणणं होतं. स्वतंत्र पुस्तक तयार आहे. पुढच्या १५ दिवसात नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल. हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत होईल” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
‘त्याला सत्यकथन म्हणा’
“आम्ही सर्व मिळवून ठरवत आहोत. कुणाच्या हस्ते प्रकाशन करायचे. हे अनुभव देशाच्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. साकेत गोखले हे साबरमती तुरुंगात गेले. संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन तुरुंगात राहिले. मनिष सिसोदीया, अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात गेले. या सर्वांना खोटे गुन्हे निर्माण करून तुरुंगात पाठवलं. कारण हे सत्य बोलत होते. आणि सरकार किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाही. पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नाही. जीवनातील अनुभव कथन करणं, त्याला गौप्यस्फोट म्हणता येत नाही. जे पाहिलं अनुभवलं ते सत्य कथन असतं. त्याला सत्यकथन म्हणा” असं संजय राऊत म्हणाले.