न्यापीताव/बँकॉक : भूकंपामध्ये प्रचंड मोठी हानी झालेल्या म्यानमारमध्ये बचावकार्य सुरू झाले असले तरी तुटलेले रस्ते व पूल, बंद पडलेली दूरसंचार यंत्रणा आणि देशातील राजकीय अस्थिरता यामुळे या कामात अनेक अडचणी येत आहेत. सोळाशेहून अधिक जणांचा मृत्यू झालेल्या या भूकंपामुळे म्यानमारमध्ये प्रचंड नुकसान झाले.
म्यानमारमधील मंडाले येथे केंद्रबिंदू असलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये अनेक इमारती कोसळून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. या ढिगाऱ्यांखाली गाडल्या गेलेल्यांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भूकंपामुळे थायलंडमध्येही १७ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही किमान ५० जण बेपत्ता आहेत.
भूकंपाच्या हादऱ्यांमुळे अनेक इमारतींना तडे गेले असून या इमारती कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. म्यानमारमध्ये लष्कराच्या ताब्यात सत्ता असल्याने स्वयंसेवी संस्थांना मदत पोहोचविण्यात अनेक अडथळे येत आहेत. रस्ते तुटले असल्याने अनेक भागांमध्ये मदतसाहित्याची वाहने नेणे त्रासदायक ठरत आहे.
म्यानमारमध्ये १,६४४ जणांचा मृत्यू झाला असून ३,४०८ जण बेपत्ता आहेत. मात्र, अनेक दुर्गम भागांमध्ये मदत पोहोचलीच नसल्याने मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. या दुर्गम भागांमध्ये स्थानिक नागरिकांकडूनच ढिगारे उपसण्याचे काम सुरू आहे.
पुन्हा एक धक्कादोन दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून म्यानमार अद्याप सावरलेला नसतानाच रविवारी पुन्हा एकदा भूकंप झाला. यावेळीही मंडाले येथेच भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.१ इतकी होती. हादरे जाणवताच नागरिक घाबरून रस्त्यावर आले होते.
भारताची मदत पोचलीभारताने लष्कराच्या पाच विमानांद्वारे म्यानमारला मदत पाठविली आहे. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारताने ‘सी-१३० जे’ प्रकारची तीन आणि ‘सी-१७’ प्रकारच्या दोन विमानांमधून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ८० जणांचे पथक शोध आणि बचावकार्यासाठी पाठवले आहेत. याशिवाय, वैद्यकीय साहित्यासह १२० जणांचे वैद्यकीय पथक मंडाले येथे तात्पुरते रुग्णालय उभारणार आहे. तसेच, भारतीय लष्कराची एक तुकडीही मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे. भारताशिवाय, चीननेही १७ ट्रकद्वारे वैद्यकीय मदत पाठविली आहे.
रुग्णालये भरलीम्यानमारमध्ये अनेक देशांची मदत आणि शोधपथके दाखल झाली आहेत. त्यामुळे बचावकार्याला वेग येत असला तरी जखमींची संख्या मोठी असल्याने येथील रुग्णालयांची क्षमता तोकडी पडत आहे. मोठ्या शहरांमधील रुग्णालये भरली असून वैद्यकीय साहित्याचाही तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांचेही स्वच्छ पाणी आणि अन्नावाचून हाल होत आहेत. मंडालेच्या विमानतळाचेही भूकंपात नुकसान झाल्याने व्यावसायिक विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे.