कऱ्हाड : दोन दुचाकींच्या अपघातात ओगलेवाडी येथील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. दुपारी एकच्या सुमारास ओगलेवाडी येथील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना घडली. विट्याहून भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने टेंभूहून येणाऱ्या दुचाकीला रेल्वे पुलानजीक जोराची धडक दिली. त्यात ओगलेवाडीतील किराणा व्यापारी वसंत मारुती मोकाशी (वय ७५) यांचा मृत्यू झाला.
या अपघातात धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोन्ही युवक किरकोळ जखमी झाले. विश्वजित अनिल मुळीक (रा. नेर्ली, ता. कडेगाव) व हर्षद प्रकाश नलवडे (रा. कडेगाव) अशी जखमींची नावे आहेत. रामचंद्र कदम (रा. बाबरमाची) यांनी पोलिसांत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले, की कऱ्हाड ते विटा महामार्गावर ओगलेवाडी येथे रेल्वे पूल आहे.
त्या पुलावर कऱ्हाड बाजूकडील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ दुचाकीची धडक झाली. किराणा व्यापारी मोकाशी दुचाकीवरून टेंभू बाजूने येऊन हनुमान मंदिराजवळून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत मोकाशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडे देण्यात आला. मोकाशी ओगलेवाडी किराणा भुसार व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ सभासद होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच ओगलेवाडी व्यापारी पेठेतील व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.