अकोला : शहरातील नागपुरी जिन परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स गोडाउनमधून तब्बल ३ लक्ष ७० लाखांचा इलेक्ट्रॉनिक माल चोरीला गेला होता. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करून चोरीचा माल जप्त केला. सदर कारवाई सिटी कोतवाली पोलिसांनी केली आहे.
अग्रवाल इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालक यश संजय अग्रवाल (रा. राधे नगर, अकोला) यांनी त्यांचे नागपुरी जिन येथील गोडाउन २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तपासले असता, तेथे ठेवलेला इलेक्ट्रॉनिक माल कमी असल्याचे आढळले. त्यांनी स्टॉक लिस्ट तपासली असता, १ फेब्रुवारी २०२५ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोडाउन फोडून माल चोरल्याचे उघड झाले.
याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२५ अन्वये कलम ३०५ (अ) भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. ठाणेदार सुनिल वायदंडे यांनी डीबी पथकाला तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित व्यक्तीचा माग काढण्यात आला.
गुप्त माहितीवरून आरोपी अटकेतगुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ (वय २३, रा. भारत नगर, अकोट फाईल, अकोला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा संपूर्ण माल पोलिसांसमोर काढून दिला.
चोरीचा माल हस्तगत, आरोपी गजाआडपोलीसांनी संपूर्ण ३,७०,००० किमतीचा माल हस्तगत केला. आरोपीला २८ मार्च रोजी अटक करून पुढील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल वायदंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, तसेच डीबी पथकाचे अंमलदार पोहेकॉ. अश्विन सिरसाट, अजय भटकर, ख्वाजा शेख, किशोर येऊल, पो. कॉ. निलेश बुंदे, शैलेश घुगे यांनी केली. या यशस्वी कारवाईमुळे अकोला पोलिसांच्या जलद आणि कुशल तपासाचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोहेकॉ. अश्विन सिरसाट करीत आहेत.