इगतपुरी- इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम आदिवासी व दुर्गम भागातील आवळखेड, चिंचलेखैरे, फांगुळगाव, तळेगाव, जामुंडे, गव्हांडे, लंगडेवाडी व त्रिंगलवाडीसह आदूरपाडा परिसरातील दुर्गम भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या दाहकतेमुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत.
तसेच गेल्या तीन-चार महिन्यांपासून हिरवा चारा मिळत नसल्याने जनावरांची चारा-पाण्याअभावी रानोमाळ भटकंती सुरू असून, चारा व पाण्याचा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहे.
तालुक्यात यंदा मार्च महिन्यातच उन्हाच्या तडाख्याने तीव्रता दाखविल्यामुळे या भागातील पाण्याचे स्रोत आटून पाणीटंचाईसह जनावारांच्या हिरवा चारा व वैरणाचा प्रश्न आता भेडसावत आहे. आवळखेड, चिंचलेखैरे, फांगुळगाव, तळेगाव, जामुंडे, गव्हांडे, लंगडेवाडी, त्रिंगलवाडी हे आदिवासी लोकवस्तीचे गावे आहेत. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन आहे.
बहुतांश कुटुंब हे रोजंदारी शेतमजुरीसाठी बाहेरगावी जात असल्याने दिवसा संपूर्ण गावे निर्मनुष्य होतात. पावसाळी शेत पिकावर अवलंबून असलेले येथील आदिवासी बांधवांकडे मोठ्या प्रमाणावर पशुधन आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर जंगलात चारा उपलब्ध होत असतो.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या भागातील पर्जन्यमान चांगले असले तरी सिंचनाचा प्रश्न कायमचा आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांना आपल्या पशुधनाच्या चारा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दररोज सकाळी खपाटीला आलेले पोट घेऊन ही जनावरे चारा-पाण्याच्या शोधात भटकंती करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमुळे पशुधन संकटात सापडून नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात पाण्याचे नैसर्गिक स्रोत गेल्या महिन्याभरापासून आटले आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही, अशी परिस्थिती जनावरांवर आल्याने त्यांना वणवण करावी लागत आहे.
- सोमा खडके, पशुपालक, चिंचलेखैरे