Match Overview: MI vs KKR IPL 2025 : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात पहिल्या दोन लढतींत पराभवाचा सामना करावा लागला. आता मुंबईचा संघ आज घरच्या वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या मोसमातील पहिली लढत खेळणार आहे. हार्दिक पंड्याची सेना गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाशी दोन हात करणार आहे. याप्रसंगी मुंबईच्या संघाचे लक्ष्य पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याकडे असणार आहे. कोलकाताचा संघ सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.
मुंबईच्या संघाला सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीतही त्यांना हार पत्करावी लागली. रोहित शर्मा व रायन रिकल्टन या दोन सलामीवीरांना पहिल्या दोन लढतींमध्ये सूर गवसलेला नाही. रिकल्टन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फलंदाजी करताना त्याचा कस लागत आहे. सूर्यकुमार यादव याने गुजरातविरुद्धच्या लढतीत ४८ धावांची खेळी साकारली, पण त्याच्या फलंदाजीत सहजता दिसून आली नाही. तरीही सूर्यकुमार याच्यासह तिलक वर्मा याच्या खांद्यावर मुंबई संघाची फलंदाजीची मदार अवलंबून असणार आहे.
उत्तम फिनिशरची गरजमुंबई संघाला सध्याच्या घडीला उत्तम फिनिशर फलंदाजाची नितांत गरज आहे. मागील काही काळात टीम डेव्हिड मुंबई संघासाठी हे काम करीत होता. मधल्या फळीत फलंदाजीला येऊन सामन्याला कलाटणी देणारी खेळी त्याच्याकडून होत होती. मुंबई संघात अशा फलंदाजांचा अभाव दिसून येत आहे. तसेच मुंबई संघात सातत्याने बदल केले जात आहेत. याचा फटकाही संघाला बसत आहे.
हार्दिक पंड्यावर लक्षमुंबई संघाच्या व्यवस्थापनाकडून मागील मोसमात रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. मुंबईकर क्रिकेटप्रेमींना हा निर्णय पसंतीस पडला नाही. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली. यंदाही पहिल्या दोन सामन्यांत मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत कोलकाता संघाविरुद्धच्या लढतीत मुंबईचा संघ उद्या वानखेडे स्टेडियमवर उतरणार आहे.
हार्दिकसाठी क्रिकेटप्रेमींचा सूर कसा असतोय याकडेही लक्ष असणार आहे. हार्दिकच्या कामगिरीवरही नजरा असणार आहेत. गुजरातविरुद्धच्या लढतीत वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे कर्णधार हार्दिकला दंड ठोठावण्यात आला. त्याच्या मानधनातून १२ लाख रुपये कापण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोलंदाजी विभाग कमकुवतजसप्रीत बुमरा दुखापतीमुळे अद्याप मुंबई संघाशी जोडला गेलेला नाही. बुमराच्या अनुपस्थितीमुळे मुंबईचा गोलंदाजी विभाग कमकुवत वाटत आहे. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, रीस टॉपले यांना वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागत आहे. बोल्टकडे अनुभव आहे, पण त्याच्याकडे वेग नाही. तरीही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुजीब उर रहमान व मिचेल सँटनर या फिरकी गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण त्यांचा वापर योग्यरितीने व्हायला हवा.
सुनील नारायणमुळे आत्मविश्वास उंचावणारअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला, मात्र राजस्थान रॉयल्सला पराभूत करण्यात त्यांना यश मिळाले. कोलकाता संघाचे खेळाडू छान खेळ करीत आहेत. रहाणेने सलामीच्या लढतीत दमदार फलंदाजी केली. क्विंटन डी कॉकने राजस्थानविरुद्धच्या लढतीत धडाकेबाज अर्धशतक झळकावले. मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल यांच्यामुळे कोलकाता संघाची फलंदाजी मजबूत आहे. वैभव अरोरा, हर्षित राणा हे गोलंदाजीत चमक दाखवत आहेत.
सुनील नारायण आजारी असल्यामुळे मागील लढतीत खेळू शकला नाही, पण मुंबईविरुद्धच्या लढतीत त्याचे पुनरागमन होण्याचे संकेत मिळाले आहेत. वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण व मोईन अली या फिरकी त्रिकूटाच्या समावेशामुळे कोलकाता संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.