सातारा : शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून, भविष्यकाळात सर्व रस्ते जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर करण्यात येतील. साताऱ्यातील हे रस्ते राज्याला पायलट प्रोजेक्ट ठरतील, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जुना आरटीओ चौक ते सुभाषचंद्र बोस चौक रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला असून, त्याचे लोकार्पण रविवारी त्यांच्या हस्ते वाढदिवसाच्या औचित्याने झाले. यावेळी आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, अभियंता दिलीप चिंद्रे, अरुण देसाई, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, विजय देसाई, दीपक पाटील, संतोष शेडगे, हेमंत आपटे, सुभाष ओंबाळे, शकील सय्यद, सुरेश जाधव, सुनील झंवर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील पहिला जर्मन टेक्नॉलॉजीयुक्त म्युझिकल रोड सातारा येथे करावा, अशी माझी संकल्पना होती. त्या संकल्पनेनुसार शहरातील पहिला म्युझिकल रोड साकारण्यात आला आहे. हा रस्ता साकारताना युटिलिटी या संकल्पनेचा पुरेपूर वापर करण्यात आल्याने विविध कामांसाठी होणारी खोदाई थांबणार आहे.
५० वर्षे टिकेल अशा पद्धतीने या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा रस्ता महाराष्ट्रातील पहिला म्युझिकल रोड ठरला आहे. खांबांवरील स्पीकरमधून पहाटेच्यावेळी नागरिकांना येथे भक्तिसंगीत ऐकण्यास मिळणार आहे. यासाठीचा नियंत्रण कक्ष देखील उभारण्यात आला असून, असा रस्ता राज्यातील पहिला रस्ता ठरला आहे.’’ शहरातील सर्वच रस्ते याच टेक्नॉलॉजीने युक्त करण्याचा मानस असल्याचेही सांगितले.