Akola News : अकोल्यातील 'या' गावात पसरली कॉलराची साथ; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Saam TV April 01, 2025 04:45 AM

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातील कासमपूर गावात 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलराची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून 250 घरांची तपासणी सुरु झाली आहे. या कॉलराच्या साथीमुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील अकोला तालुक्याल्या कासमपुर (पळसो) गावात कॉलराची साथ पसरली आहे. या अनुषंगाने अकोला जिल्हा आणि तालुका पथकाने त्याठिकाणी जात तपासणी केली. या दरम्यान, गावातील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलरा झाल्याचे चाचणीत समोर आले. या विद्यार्थ्यांवर अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार होत आहेत. दरम्यान, कॉलरा उद्रेक जाहीर करताचं गावात भीतीच वातावरण पसरलाय.

मौजे कासमपुर (पळसो) येथे 30 मार्चपासून कॉलरा उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य पथकाकडून गावातील तब्बल 205 घरांची तपासणी करण्यात आली आहे. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी यासह इतर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 8 वर आहे. या सर्वांवर पळसो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खासगी रूग्णालयात उपचार होत आहेत.

पथकाकडून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उकळून आणि आरओ पाण्याचा वापर करण्याबाबत, तसेच कुठलीही लक्षणे आढळताच तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय गावकऱ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. अशी माहिती अकोला जिल्हा प्रशासन दिली आहे. दरम्यान, कॉलरा हा एक जीवाणूजन्य आजार आहे. जो सामान्यतः दूषित पाण्याद्वारे पसरतो. असुरक्षित पिण्याचे पाणी, अस्वच्छता आणि अपुरी स्वच्छता असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कॉलराचा सर्वाधिक धोका ठरु शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावं. त्यासोबतच घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केलय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.