पुणे : कुटुंबाची बोलणी झाली, दोघांची मन जुळाली, आणि लग्नटिका समीप आली. पण काही दिवसांनी नवरी मुलीला नवरदेव मुलगा नापसंत झाला. होणाऱ्या नवऱ्याला ठार मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे घटना अहिल्यानगरमधील असून आरोपी देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
पुण्याच्याजवळ असलेल्या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडेचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र, मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या चौकशीत समोर आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुकचं काम करतो. २७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची कार देखील ताब्यात घेतली आहे.