Beed News : जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून मारण्याचा प्लॅन आखला, वाल्मिक कराडवर मीरा गितेंचा गंभीर आरोप
Saam TV April 01, 2025 04:45 AM

बीड : बीड जिल्हा कारगृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना गिते गँगचे आरोपी महादेव गिते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. पण बीड पोलिसांनी या दाव्याचं खंडन करत दुसरीकडे पोलिसांनी महादेव गिते आणि इतर तीन कैद्यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवाना केलं आहे. हर्सुल कारागृहात महादेव गिते आणि इतर तीन कैद्यांना पोलीस घेऊन जात असताना बीड कारागृहाबाहेर आरोपींनी कॅमेऱ्यासमोर वेगळाच दावा केला. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आपल्याला मारहाण झाल्याचा दावा महादेव गितेने केला. तसेच यासाठी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं आवाहन केलं. यानंतर आता महादेव गितेच्या पत्नी मीरा गित्ते यांनी गंभीर आरोप केला आहे.

आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून आपल्या पतीला मारहाण करण्याचा प्लॅन आखला, असा आरोप मीरा गिते यांनी केला. त्यांनी एका प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिली, यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'चुकीचं झालं आहे आणि सगळं काही खोटं आहे. मलाही माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत फोनवर माझंही बोलणं झालेलं आहे', असा दावा मीरा गिते यांनी केला.

'गुढीपाडव्याच्या अगोदरपासून त्यांची ही प्लॅनिंग सुरु होती. तुम्ही तीन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज मागवून घ्या. कुणी कुणाला मारलं ते स्पष्ट होईल. कारण माझ्या पतीला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यांना मारहाण झालेली आहे. एक तर ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय. त्यात त्यांना दवाखान्यात सुद्धा घेऊन गेलेले नाहीत, असा आरोप देखील यांनी केला.

'इतक्या लवकर कशी ही हालचाल झाली? इतक्या लवकर त्यांना हलवण्यात आलं. म्हणजे यांची काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. याच गोष्टीसाठी ते काहीतरी करत आहेत. अक्षय आठवलेचं नाव घेण्यात आलं आहे. पण त्यांना तिथून का हटवलं नाही? त्यांना का तिथेच ठेवलं? असा सवालही मीरा गिते यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.