- अनंत सुपनर
कारंजा - भरधाव कारने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत कामरगांव तालुका कारंजा येथील डॉक्टर अरुण तुळशीराम गायधने (वय-६५ वर्ष) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार डॉ. अरुण गायधने ३१ मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता कामरगांव येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड येथील शेतात जात असताना मागून भरधाव येत येणाऱ्या कारने त्यांचे दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
यामध्ये डॉ. गायधने गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गायधने यांना कामरगांव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालय प्रशासनाने अमरावती रेफर केले. अमरावती येथे त्यांना भरती केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघातस्थळी असणाऱ्यांनी पांढ-या रंगाच्या निसान मॅग्नेट कंपनीच्या कार क्रं. एम.एच.12 एक्स.ई. 7973 ने धडक दिल्याचे सांगितल्यावरुन धनज बु पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धनज बु पोलीस करीत आहेत. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला.