कर्नाटकातील विजापूर मतदारसंघाचे आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांना नुकतेच भाजपने पक्षातील सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
आमदार पाटील हे मागील काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात घराणेशाहीवर आणि भ्रष्टाचारावर सतत बोलतात. मग तरीही विजयेंद्र प्रदेशाध्यक्ष पदावर कसे, असे आव्हान देत आमदार पाटील यांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
आमदार पाटील हे सातत्याने विजयेंद्र यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे पक्षविरोधा कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.
विजापूर मतदारसंघातून 1994 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने ते या निवडणुकीत विजयी झाले.
1999 आणि 2004 मध्ये पक्षाने त्यांना विजापूर मतदारसंघातून लोकसभेत पाठवले. 2002 ते 2004 या काळात ते केंद्रीय राज्यमंत्री होते.
भाजपने 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर आमदार पाटील यांनी 2010 मध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलात प्रवेश केला. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले.
जनता दलातून पुन्हा भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात 2015 मध्ये विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि विजयीही झाल. त्यानंतर भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले.
निलंबनानंतर तीन वर्षांतच भाजपने त्यांना पुन्हा पक्षात घेतले. त्यानंतर 2018 आणि 2023 च्या निवडणुकीत ते पुन्हा विधानसभेत निवडून गेले.