ईदच्या दिवशी केलेल्या भाष्यावर भाजपची तीव्र प्रतिक्रिया, भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
वृत्तसंस्था / कोलकाता
आपण घाणेरड्या धर्माचे पालन करत नाही, अशी भाषा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या दिवशी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या धर्माला घाणेरडा धर्म (गंदा धर्म) असे उल्लेखिले आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. बॅनर्जी यांचा रोख हिंदू धर्माकडे आहे काय, असाही प्रश्न या विधानामुळे निर्माण झाला आहे.
बॅनर्जी यांनी नुकताच ब्रिटनचा दौरा केला होता. या दौऱ्यातही त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती. कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी त्यांना या दौऱ्यात अनेक अडचणीचे प्रश्न विचारण्यात आले होते. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना धारेवर धरले होते. आता भारतात परतल्यानंतर त्यांनी गंदा धर्म असा उल्लेख करुन नवा वाद निर्माण केला आहे.
सुवेंदू अधिकारी यांची टीका
ममता बॅनर्जी यांनी नेमक्या ईदच्या दिवशी केलेले हे विधान मुस्लीम लांगूलचालनाचे एक उदाहरण आहे. आपण घाणेरडा धर्म पाळत नाही, हे स्पष्ट केले आहे. आता नेमक्या कोणत्या धर्माला त्या घाणेरडा मानतात यावर त्यांनीच प्रकाश टाकावा. त्यांच्या दृष्टीने सनातन धर्म घाणेरडा आहे का, हे त्यांनीच आता लोकांसमोर मांडावे, अशी मागणी सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी केली.
‘दंगा’ या शब्दाचाही वारंवार उल्लेख
बॅनर्जी यांनी ईदच्या दिवशी केलेल्या विधानांमध्ये दंगा या शब्दाचाही वारंवार उपयोग केला आहे. अशा शब्दांचा उपयोग करण्यामागे त्यांचा हेतू हा समाजच्या विविध घटकांमध्ये एकमेकांच्या विरोधात असंतोष निर्माण करणे हा आहे. त्यांना राज्यात ‘दंगा’ हवा आहे काय, अशी विचारणाही अधिकारी यांनी केली.
निवडणुकांना समोर ठेवून…
पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बॅनर्जी यांनी त्यांच नेहमीचा खेळ सुरु केला आहे. प्रक्षोभक विधाने करुन लोकांमध्ये गोंधळ निर्माण करणे आणि त्यांची दिशाभूल करणे हे त्यांचे नेहमीचेच डावपेच आहेत. यावेळी त्यांना निवडणूक अवघड आहे. जनमत त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी गोंधळात टाकणारी विधाने करण्याचा राजकीय खेळ पुन्हा हाती घेतला आहे, असेही प्रतिपादन अधिकारी यांनी केले.