पंतप्रधान मोदी उधमपूरला जाणार : कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचेही उद्घाटन होणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर
पंतप्रधान मोदी 19 एप्रिल रोजी उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील. तसेच ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत. सर्वप्रथम, ते उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे (चिनाब पूल) उद्घाटन करतील. यानंतर, ते कटरा (माता वैष्णोदेवी) येथे पोहोचून वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. काश्मीर खोऱ्याला रेल्वेने जगाच्या इतर भागाशी जोडण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण असेल. उद्घाटनाच्या वेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर अधिकारी उपस्थित राहतील.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी पंतप्रधानांच्या काश्मीर दौऱ्याविषयीची माहिती दिली. आता लवकरच काश्मीरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटनही करतील. या ट्रेनच्या उद्घाटनानंतर, काश्मीर भारताच्या कोणत्याही भागाशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडले जाईल. या भागात रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी बऱ्याच काळापासून होत होती.
सध्या जम्मू रेल्वेस्थानकावर दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळे कटरा येथून तात्पुरती रेल्वेसेवा सुरू करण्यात येत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन ऑगस्टपासून जम्मूहून धावण्यास सुरुवात करेल. कटरा-श्रीनगर दरम्यान या ट्रेनची चाचणी 25 जानेवारी रोजी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. चाचणीवेळी ही गाडी सकाळी 8 वाजता कटरा येथून निघाल्यानंतर काश्मीरमधील शेवटचे स्टेशन असलेल्या श्रीनगरला सकाळी 11 वाजता पोहोचली होती. म्हणजे 160 किलोमीटरचा प्रवास 3 तासात पूर्ण झाला होता.