एका प्रीस्कूलच्या मुख्यध्यापीकेने एका पालकांशी जवळीक साधून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्यध्यापीकेला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
बंगळुरूमधील कळसीपाळ्या भागातील ३४ वर्षीय पालक रमेश (बदललेले नाव) यांनी २०२३ मध्ये आपल्या मुलीला एका प्रीस्कूलमध्ये दाखल केले. त्या वेळी त्यांची ओळख या शाळेच्या मुख्यध्यापीका (२५) यांच्याशी झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर जवळच्या नात्यात झाले.
रमेशने मुख्यध्यापीकेसाठी वेगळा सिमकार्ड आणि फोन घेतला आणि व्हॉट्सअॅपद्वारे दोघांमध्ये संवाद सुरू राहिला. वेळोवेळी भेटी झाल्या आणि मुख्यध्यापीका रमेशकडून हळूहळू चार लाख रुपये घेतले. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये तिने थेट १५ लाख रुपयांची मागणी केली आणि एकत्र राहण्याचा प्रस्ताव दिला.
ब्लॅकमेलिंगचा कट!फेब्रुवारी महिन्यात मुख्यध्यापीकेने रमेशच्या घरी भेट देऊन ५०,००० रुपये घेतले. मात्र, मार्चच्या सुरुवातीला नात्यात दुरावा आला. रमेश आर्थिक अडचणीत असल्याने कुटुंबासह गुजरातला स्थलांतर करण्याचा विचार करत होता आणि त्यासाठी आपल्या मुलीचा ट्रान्सफर सर्टिफिकेट मागण्यासाठी मुख्यध्यापीकेच्या ऑफिसला गेला.
तिथेच गणेश काळे (३८) आणि सागर (२८) यांनी त्याला धमकावत २० लाख रुपये मागितले. या रकमेच्या बदल्यात मुख्यध्यापीकासोबतचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्याचे ते म्हणाले. सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी रमेशने १.९ लाख रुपये तत्काळ दिले, मात्र आरोपींनी उर्वरित रक्कमेचा तगादा लावला.
मार्च १७ रोजी मुख्यध्यापीकेने रमेशला पुन्हा फोन करून पैशांची मागणी केली आणि पैशांचे वाटप कसे होणार आहे, हे सांगितले. तिने म्हटले की, ५ लाख रुपये माजी पोलीस उपायुक्ताला दिले जातील, तर गणेश आणि सागर प्रत्येकी १ लाख रुपये घेतील. उरलेले ८ लाख स्वतःसाठी ठेऊन ती सर्व पुरावे नष्ट करेल.
पोलिसांकडे तक्रार, मोठा कट उघडरमेशवर सातत्याने दबाव टाकला जात असल्याने शेवटी त्याने पोलिसांकडे धाव घेतली. मध्यवर्ती गुन्हे शाखेने (CCB) त्वरीत कारवाई करत मुख्यध्यापीका, गणेश काले आणि सागर यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कलम १४० (२) – अपहरण
कलम ३०८ (२) – खंडणी
कलम ३०८ (४) – प्राणघातक धमकीद्वारे खंडणी
कलम ३५१ (२) – गुन्हेगारी धमकी
पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.