किटो डाएट आणि वैज्ञानिक आधार
esakal April 01, 2025 10:45 AM

डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट

आजच्या युगात ‘किटोजेनिक डाएट’ हा चर्चेचा विषय बनला आहे. वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह व मेंदूच्या आरोग्यासाठी हा आहार फायदेशीर असल्याचे अनेकांचे मत आहे; पण हा आहार केवळ एक फॅड आहे का, की त्यामागे ठोस वैज्ञानिक आधार आहे? ते पाहूया.

काय आहे किटोजेनिक डाएट?

किटोजेनिक रेजीम (किटो डाएट) हा High Fat, Low Carbohydrate आणि Moderate Protein असा आहार आहे. साधारणतः यात ५-१० टक्के कर्बोदके, ७०-८० टक्के स्निग्ध पदार्थ आणि १५-२० टक्के प्रथिने असतात. कार्बोहायड्रेटचे प्रमाण अत्यल्प ठेवल्याने शरीर ‘किटोसिस’ या स्थितीत प्रवेश करते. किटोसिसमध्ये शरीर ग्लुकोजऐवजी केटोन्स तयार करते, जे विशेषतः मेंदूसाठी प्रभावी इंधन असते.

किटो डाएटच्या महत्त्वाच्या बाबी इन्सुलिन प्रतिकार आणि मधुमेह

इन्शुलिन प्रतिकार हा टाईप २ मधुमेह आणि लठ्ठपणाच्या मुळाशी असतो. संशोधन दर्शवते, की कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. त्यामुळे हा आहार मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो. (किटोजेनिक डाएट आणि किटोएसीडोसीस या संकल्पना भिन्न आहेत.)

मेंदूचे आरोग्य आणि न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार

अल्झायमर, एपिलेप्सी आणि पार्किन्सन्ससारख्या विकारांमध्ये किटो डाएट प्रभावी ठरतो. कारण मेंदूला कार्बोहायड्रेट्सऐवजी केटोन्सचा स्वच्छ आणि कार्यक्षम इंधनस्रोत मिळतो. काही अभ्यासांनुसार हा आहार न्यूरोइन्फ्लेमेशन कमी करतो.

हृदयाचे आरोग्य आणि लिपिड प्रोफाइल

किटो डायट घेतल्यावर सुरुवातीला कोलेस्टेरॉल पातळीत बदल होतो. मात्र, एलडीएलचे मोठे कण (Big Fluffy Particles) वाढतात, जे सुरक्षित मानले जातात. तसेच, ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होते, एचडीएल वाढते आणि टीजी/एचडीएल रेशो सुधारतो, ज्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ सुधारते.

किटो डाएट : सर्वांसाठी योग्य आहे का?

Therapeutic Carbohydrate Restriction किंवा Ketogenic Dietary Regime हा केवळ ‘डाएट’ नसून एक लाइफस्टाइल आहे. दोन महिने करून सोडून देण्याऐवजी योग्य मार्गदर्शनाखाली दीर्घकालीन आहार म्हणून अवलंबावा. प्रत्येकाची चयापचय प्रक्रिया वेगळी असते, त्यामुळे तो फंक्शनल न्यूट्रिशनिस्टच्या मार्गदर्शनाखाली करावा.

निष्कर्ष

किटो डाएट हा केवळ फॅड नसून ठोस वैज्ञानिक आधार असलेला आहारप्रकार आहे. मात्र, तो स्वतःहून न करता, फंक्शनल मेडिसिन आहारतज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच अवलंबावा. प्रत्येकाच्या आरोग्याच्या स्थितीनुसार ही लाइफस्टाइल योग्य आहे का, हे ठरवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि वैयक्तिक आरोग्यानुसार हा आहार घ्यावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.