हरवलं नाही; उलट घडवलं!
esakal April 01, 2025 10:45 AM

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सर हा शब्द ऐकला, की मनात भीती, चिंता आणि असंख्य प्रश्न उभे राहतात. जेव्हा मला कॅन्सर झाल्याचे कळले, तेव्हा माझ्या मनातही हेच विचार आले; पण या प्रवासाने मला नवी शिकवण दिली, एक नवीन दृष्टिकोन दिला – जीवनाच्या प्रत्येक क्षणाला स्वीकारण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याचा.

आज मी केवळ एक कॅन्सर सर्वायव्हर नाही, तर कॅन्सर अवेअरनेससाठी माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी कॅन्सर हा संघर्ष न राहता, संधी ठरला – जीवन नव्याने समजून घेण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत बनण्याची संधी.

मी हा लेख केवळ माझ्या प्रवासाबद्दल नाही, तर त्या प्रत्येकासाठी आहे जो कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. कॅन्सरने शिकवलेले जीवनाचे धडे:

  • आरोग्य हेच खरे धन : कॅन्सरने मला समजावले, की शरीराची काळजी घेणे ही फक्त गरज नाही, तर ती जबाबदारी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे याला मी आता अधिक प्राधान्य देते. मी केमोथेरपीच्या कठीण दिवसांमध्येही सकारात्मक विचार ठेवले आणि माझ्या शरीराला आधार दिला.

  • मानसिक ताकद सर्वात मोठी शक्ती : कॅन्सर फक्त शारीरिक आजार नसतो, तो मानसिक संघर्षही असतो. अनेकवेळा बरेच प्रसंग असे आले, जिथे मला डॉक्टरांच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागला; पण मी खचले नाही. ‘जे होतं ते चांगल्यासाठी’ असा सकारात्मक विश्वास माझ्या मनात ठेवला. मनाला उभारी दिली. मानसिक ताकद असेल, तर कोणताही आजार आपल्याला हरवू शकत नाही.

  • नाती अधिक मजबूत झाली : या प्रवासात मला माझ्या कुटुंबाची आणि मित्र-मैत्रिणींची खरी किंमत कळली. त्यांच्या प्रेमाने आणि आधारानेच मी हा संघर्ष सोपा केला.

  • प्रत्येक दिवसाची किंमत कळली : पूर्वी मीही अनेक छोटे क्षण गृहित धरत असे; पण कॅन्सरने मला शिकवले, की प्रत्येक दिवस हा अनमोल आहे. मी आता प्रत्येक क्षण जगते, आनंद साजरा करते, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते.

  • समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव झाली : कॅन्सरमधून बाहेर पडल्यावर मी ठरवले की मी कॅन्सर अवेअरनेससाठी काम करेन. कारण, मला माहीत आहे की सुरुवातीला ही लढाई किती एकटी वाटते. मी लोकांना या आजाराविषयी माहिती देते, त्यांना भावनिक आधार देते, उपचारप्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करते. हे काम करताना मिळणारा आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नसतो.

  • कॅन्सरशी सामना करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे संदेश

  • भीतीला जिंकू देऊ नका : सकारात्मक राहा, कारण मानसिक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो.

  • स्वतःची काळजी घ्या : योग्य आहार, योग, ध्यान यांचा अवलंब करा.

  • आधार घ्या आणि द्या : कुटुंब, मित्र, आणि सपोर्ट ग्रुप्स यांचा आधार घ्या.

  • आशा सोडू नका : आधुनिक उपचार आणि संशोधनामुळे कॅन्सरवर मात करणे शक्य आहे.

  • जगण्याच्या नवीन संधी शोधा : कॅन्सर हा शेवट नाही, तर नव्याने जगण्याची सुरुवात आहे.

  • कॅन्सरने मला अनेक कठीण प्रसंग दिले; पण त्याचबरोबर मला अधिक मजबूतही बनवले. आता मी जीवन अधिक प्रेमाने जगते, प्रत्येक क्षणाचा आनंद घेते, आणि इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते. कॅन्सरने मला, ‘ब्युटी ऑफ लाईफ’ पुस्तकाची लेखिका बनवलं. लेखिका म्हणून माझी एक नवीन ओळख निर्माण झाली. मला खात्री आहे, की कोणतीही कठीण परिस्थिती संधीमध्ये बदलता येते - फक्त आपण ती जिद्दीने स्वीकारायला हवी!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.