बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून, मारहाण करून त्यांना बदनाम करण्याचाही आरोपींचा कट होता. त्यांना मारहाण करतानाचे व त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडिओ व्हायरल करायचे आणि त्यानंतर त्यांना कळंब (जि. धाराशिव) येथे नेऊन तेथील एका महिलेवरुन त्यांच्यावर गंभीर आरोप करायचे असा कट होता, असा आरोप सुरुवातीपासून होत आहे. संबंधित महिलेचा खूनच झाल्याचे समोर आले आहे.
आडस (ता. केज) येथील संबंधित महिला कळंबला राहत असे. या महिलेचे व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची जवळीक होती. देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली. मात्र, हत्येनंतर त्यांचा मृतदेह राजेगाव (ता. केज) जवळ आढळला असताना संशयितांचे संबंधित वाहन कळंब मार्गे आले. त्यामुळे देशमुख यांना बदनाम करण्याचा आरोपींचा कट होता, महिलेला त्यांच्यावर गंभीर आरोप करायला लावायचे होते. त्यासाठीच कळंबच्या महिलेची निवड करण्यात आल्याचा सुरुवातीपासून आरोप होता. या महिलेची चौकशीही झाली होती.
संबंधित महिलेचा मृतदेह सहा दिवसांपूर्वी कळंब येथील तिच्या राहत्या घरात आढळला होता. तिचा खून झाल्याचे उत्तरीय तपासणीतून समोर आले आहे. या महिलेने यापूर्वी दोघांवर बलात्काराचे गुन्हे नोंदविले आहेत.