मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल पदार्पण, वानखेडे स्टेडियमवर सामना अन् ४ विकेट्स घेण्याची कामगिरी, कोणत्याही युवा खेळाडूसाठी हे एक स्वप्नासारखे असेल. पण हेच स्वप्न अश्वनी कुमारचे मात्र साकार झाले.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील १२ वा सामना वानखेडे स्टेडियमवर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सोमवारी (३१ मार्च) खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकाताचा संघ १७ षटकांच्या आतच ११६ धावांवर सर्वबाद झाला. यात २३ वर्षीय अश्वनी कुमारचे मोठे योगदान राहिले. त्याने त्याच्या गोलंदाजीने सर्वांवरच छाप पाडली.
त्याने या सामन्यातून मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. पदार्पणानंतर त्याच्याकडे चौथ्या षटकात हार्दिक पांड्याने गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या अश्वनी कुमारने पहिल्याच चेंडूवर दिग्गज अजिंक्य रहाणेला चकवले. रहणेचा अफलातून एकहाती झेल तिलक वर्माने ११ धावांवर घेतला.
त्यामुळे अश्वनीसाठी रहाणे त्याची पहिली आयपीएल विकेट ठरला. तेवढ्यावरच अश्वनी थांबला नाही, त्याने नंतर रिंकु सिंग, मनिष पांडे आणि आंद्र रसेल या स्फोटक फलंदाजांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मनिष आणि रसेलला तर त्याने त्रिफळाचीत केलं.
त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो पहिल्याच आयपीएल सामन्यात ४ विकेट्स घेणारा पहिला भारतीय, तर एकूण सहावा गोलंदाज ठरला आहे. पण हा अश्वनी कुमार आहे कोण? हे थोडक्यात जाणून घेऊ.
२९ ऑगस्ट २००१ रोजी मोहालीतील झांजेरी येथे जन्मलेला अश्वनी कुमार डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. तो चेंडूला चांगली उसळी देऊ शकतो आणि त्याच्या गोलंदाजीत विविधताही आहे. वाईड यॉर्कर त्याची ताकद आहे. त्यामुळे तो डेथ ओव्हर्समध्ये (१६ ते २० षटके) अत्यंत प्रभावी ठरतो.
अश्वनी पंजाबसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी २०१९ मध्ये पंजाबसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर २० व्या वर्षात २०२१ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला पंजाबसाठी टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी २०२२ मध्ये मिळली. त्याला पदार्पणाच्या संधी तर मिळाल्या, पण त्याला सातत्याने खेळण्याची संधी मिळत नव्हती.
पण तो प्रकाश झोतात आला ते पंजाबने सुरु केलेल्या त्यांच्या टी२० लीग स्पर्धेतून. २०२३ साली शेर ए पंजाब टी२० ट्रॉफीमध्ये त्याने प्रभावित केले होते. त्याने बीएलव्ही ब्लास्टर्सकडून खेळताना १० सामन्यात ८ विकेट्स घेतल्या. त्याच्या संघाने विजेतेपदही मिळवलं.
त्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षीही म्हणजे २०२४ मध्येही त्याने अग्री किंग्स नाईट्सकडू खेळताना आणखी चांगली कामगिरी केली. त्याने ७ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे पंजाब संघातही पुनरागमन झाले. त्याला सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीसाठी निवडण्यात आलं. या स्पर्धेत तो अभिषेक शर्माच्या नेतृत्वात खेळला. त्यानंतर त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठीही संघात स्थान मिळाले. त्याने अरूणाचल प्रदेशविरुद्ध ३७ धावात ३ विकेट्स घेतल्या.
त्याच्यावर नंतर मुंबई इंडियन्सच्या स्काउंटींग टीमची नजर गेली. त्याला मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ लिलावात ३० लाखांच्या किंमतीत संघात घेतलं आणि आता त्याला पदार्पणाची संधीही दिली. त्यानेही या संधीचा फायदा घेतला आणि इतिहास रचला.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की तो आयपीएल २०२४ साठी पंजाब किंग्सचा भाग होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
दरम्यान, आयपीएल २०२५ मध्ये मुंबईने संधी दिलेला तो पहिलाच युवा खेळाडू नाही. मुंबईने पहिल्या तीन सामन्यातच त्याच्याव्यतिरिक्त विग्घेश पुथुर आणि सत्यनारायण राजू या खेळाडूंनाही संधी दिली आहे. त्यांनीही आपली वेगळी छाप पाडली आहे.