अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच ते पुतीन यांच्यावर रागावलेले आहेत असंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता रशियाकडूनही त्यावर प्रतिक्रिया आलेली आहे. आम्ही आता पण अमेरिकेसोबत काम करत आहोत, असं रशियानं म्हटलं आहे.
दोन्ही नेत्यांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न क्रेमलिनने आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेतून केला आहे. आम्ही अमेरिकेसोबत काम करणे सुरूच ठेवणार असून सुरुवातीला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर काम करू, असं रशियाच्या राष्ट्रपतींचे प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये या आठवड्यात कुठलीही चर्चा नियोजीत नाही. पण, गरज असेल तर पुतीन चर्चेसाठी तयार आहेत.
रशियाकडून अशी प्रतिक्रिया येण्याचं कारण म्हणजे रविवारी ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला एक मुलाखत दिली. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर संशय घेतल्याबद्दल ट्रम्प यांनी पुतीन यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पुतीन युद्धबंदीसाठी सहमत झाले नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या 50 टक्के कर लादण्याची धमकी देखील ट्रम्प यांनी दिली.
युक्रेनमधील युद्ध संपविण्यासाठी काय करता येईल यासाठी अमेरिका आणि रशियन अधिकारी गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा करत आहेत. या दरम्यान ट्रम्प यांनी अनेकदा झेलेन्स्की यांच्यावर टीका केली होती. पण, त्यांनी पुतीन यांच्यावर टीका करणं टाळलं होतं.
पण, युक्रेनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्यानं एक नवीन सरकार स्थापन करण्याचा सल्ला पुतीन यांनी दिला होता. त्यामुळे झेलेन्स्की यांच्या जागी कोणीतरी दुसरे राष्ट्राध्यक्ष येऊ शकतात. पुतीन यांच्या या वक्तव्यानंतर ट्रम्प यांचा पारा चढला.
तुम्ही म्हणू शकता मी खूप रागावलो आहे. पण, पुतीन झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे योग्य नाही, असं ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं.
नवीन नेतृत्व आलं तर तुमच्यामध्ये युद्धबंदीचा करार होण्यासाठी आणखी बराच काळ लागेल असंही ते म्हणाले.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पेस्कोव्ह यांनी दावा केला की एनबीसीच्या मुलाखतीत जे काही सांगितलं ते अगदी परिभाषित होतं.
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर रशियाच्या काही मीडियांमध्ये बातम्या येऊ लागल्या आहेत. क्रेमलिन समर्थक रशियन वृत्तपत्र, मोस्कोव्हस्की कोमसोमोलेट्सने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका केली असून ट्रम्प रशियन ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यापासून युक्रेनला रोखण्याची त्यांची जबाबदारी पूर्ण करत नाही असं म्हटलंय.
तसेच ट्रम्प यांच्यासाठी मार्केटच्या दिवशी सर्व करारांची किंमत काही पैशांपुरती आहे, असाही निष्कर्ष या वृत्तपत्रानं काढला असून मॉस्को अमेरिकन अध्यक्षांशी करार करण्यास तयार असल्याचंही या वृत्तापत्रात म्हटलंय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.