(एप्रिल महिना हा सर्व जगभरात 'दलित हिस्ट्री मंथ' म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म याच महिन्यात झाला म्हणून या महिन्याला 'दलित हिस्ट्री मंथ' म्हटलं जातं. दलितांचा संघर्ष आणि कठोर परिस्थितीत झगडून त्यावर मात केलेल्या वंचित समुदायातील नायक-नायिकांची आठवण म्हणून दलित हिस्ट्री मंथ साजरा केला जातो. बीबीसी मराठी या निमित्ताने तुमच्यासाठी काही खास लेख घेऊन येत आहे.)
"अहंकाररुपिणी" (अहंकाराचं प्रतीक)... "पापी"... व्याभिचारी... "मनुस्मृतीचे नियम मोडणारी घृणास्पद स्त्री" - हे शब्द मल्याळम कवी कुरिपुझा श्रीकुमार यांच्या नादियुदे रात्री (अभिनेत्रीची रात्र) या कवितेत नोंदवलेले आहेत.
पी. के. रोझी मल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिली महिला अभिनेत्री.
सुमारे 100 वर्षांपूर्वी त्यांचा पहिला आणि अखेरचा चित्रपट ठरलेल्या 'विगत कुमारन'चा (हरवलेलं मूल) प्रीमियर झाला होता. त्यावेळी जातीयवादी समाजानं त्यांच्याविरोधात याच भावना व्यक्त केल्या होत्या.
पी. के. रोझी या दलित समाजातील होत्या आणि त्यांनी मूकपटात नायिकेची भूमिका साकारली होती.
हा चित्रपट 1928 मध्ये ( चित्रपटाच्या प्रदर्शन वर्षाबाबत काही मतभेद आहेत) तिरुअनंतपूरम येथे प्रदर्शित झाला होता.
चित्रपट निर्माते जे. सी. डॅनियल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांना मल्याळम सिनेमाचे जनक म्हटलं जातं.
जेव्हा या सिनेमात एका दलित महिलेला एका नायर महिलेची भूमिका देण्यात आली, तेव्हा उच्च जातीचे लोक संतापले. त्यांनी सिनेमागृहात तोडफोड केली.
डॅनियल आणि रोझी यांना तेथून पळवून लावलं. त्यानंतरही हिंसाचार काही थांबला नाही. जमावानं रोझी यांचं घर पेटवून दिलं.
वर्ष 2003 मध्ये प्रसिद्ध झालेल्या श्रीकुमार यांच्या एका मार्मिक कवितेनं कायमच्या विस्मृतीत गेलेल्या रोझी आणि त्या घटनेला पुन्हा उजाळा मिळाला.
त्यांच्या जीवनाबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. गुगलने 2023 मध्ये त्यांच्या 120 व्या जन्मदिनी एक डुडल समर्पित केलं होतं.
परंतु, त्यांच्या खऱ्या जन्मतारखेबाबत अजून स्पष्टता नाही. या जन्मतारखेला अद्यापही दुजोरा मिळालेला नाही.
लेखक विनू अब्राहम यांनी नष्टनायिका (हरवलेली नायिका) नावाची कादंबरी लिहिली आहे. ते म्हणतात की, रोझी यांच्या जन्म आणि मृत्यूबाबत ठोस माहिती नाही. इतकंच काय त्यांचा जो फोटो सध्या सगळीकडे दिसतो, त्याबाबतही शंका उपस्थित केली जाते.
रोझी यांचा जन्म 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला तिरुवनंतपूरम येथील पुलाया समाजात झाला होता. या समुदायाला 'अस्पृश्य' समजलं जात असे.
उपजीविकेसाठी त्या गवत कापण्याचं काम करत असत. परंतु, अभिनयाच्या आवडीमुळं त्यांना कक्करासी (लोकनाट्य प्रकार) नाटकात काम करण्याची संधी मिळाली.
कक्करासी नाटकात काम करणाऱ्या रोझी या पहिल्या महिला होत्या असं बोललं जातं. नाटकात काम करत असतानाच रोझी यांची डॅनियल यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांना विगतकुमारनमध्ये काम दिलं.
जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं...या सिनेमाच्या प्रीमियरनंतर झालेल्या गोंधळामुळं रोझी यांना जीव वाचवण्यासाठी तिरुअनंतपूरम सोडून पळून जावं लागलं. त्या नागरकोईलकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये बसून गेल्याचं सांगितलं जातं. हा ट्रक केशव पिल्लई नावाचा व्यक्ती चालवत होता.
नंतर त्यांनी याच केशव पिल्लईबरोबर लग्न केलं. केशव हे नायर समुदायातील होते. त्यांनी आपली खरी ओळख लपवून उर्वरित आयुष्य याच समाजात व्यतीत केलं. हा तोच समाज होता, ज्यांनी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला होता.
त्यांचा 80 च्या दशकात मृत्यू झाल्याचं बोललं जातं. याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
डॅनियल खरंतरं एक सुखवस्तू कुटुंबातील होते. परंतु, विगतकुमारनचं अपयश आणि त्यानंतरही चित्रपट तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळं ते आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले.
1960 च्या दशकात इतिहासकार आणि पत्रकार चेलंगाट्ट गोपाळकृष्णन यांनी त्यांचे योगदान समाजासमोर आणले. चेलंगाट्ट यांनी डॅनियल यांना मल्याळम सिनेमाचे जनक म्हणून मान्यता मिळवून दिली. 1975 मध्ये डॅनियल यांचा मृत्यू झाला.
रोझीला ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न70 च्या दशकापासून इतिहासकार कुन्नुकुझी एस. मणी यांनी रोझी यांच्याबद्दल लिहायला सुरुवात केली. 21 व्या शतकात रोझी यांना ओळख मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.
विनू अब्राहम यांना 2005 मध्ये केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरम्यान रोझी यांच्याबाबत पहिल्यांदा समजलं.
दलित लेखकांच्या एका संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या एका विरोधी पत्राच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यावर संशोधन केलं. त्या आधारावरच त्यांनी 'नष्टनायिका' नावाची कादंबरी लिहिली.
त्यानंतर 2013 मध्ये दिग्दर्शक कमल यांनी 'सेल्यूलॉइड' हा मल्याळम सिनेमा बनवला. यामध्ये पृथ्वीराज सुकुमारनने डॅनियल यांची भूमिका निभावली. तर नवोदित अभिनेत्री चांदनी गीतानं रोझी यांचं पात्र साकारलं.
मात्र, रोझी यांना या सिनेमात उच्चवर्णीय दृष्टिकोनातून सादर केल्याबद्दल टीकाही झाली. तरीही, रोझी यांच्या जीवनावर बनलेला हा आतापर्यंतचा सर्वात चर्चित चित्रपट ठरला.
2019 मध्ये, वूमन इन सिनेमा कलेक्टिव्ह (WCC) ने सिनेमात महिला आणि स्त्रीवादाचा प्रचार करण्यासाठी पी. के. रोझी फिल्म सोसायटीची स्थापना केली.
डब्ल्यूसीसीच्या संस्थापक सदस्य बीना पॉल म्हणतात, "रोझी यांच्याबाबत कदाचित पूर्ण नोंद नाही किंवा त्यांची माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांचं अस्तित्व जात आणि लिंग यांच्या संघर्षाचं प्रतीक बनलं आहे."
तामिळनाडूमध्ये चित्रपट निर्माते पा. रणजित यांच्या नीलम कल्चरल सेंटरने पी.के. रोझी चित्रपट महोत्सव सुरू केला. ज्यामध्ये दलित विषयावर बनवलेले चित्रपट सादर केले जातात.
2024 मध्ये केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सिग्नेचर व्हिडिओमध्येही रोझी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दलितांना हक्काचं स्थान कधी मिळणार?हे सर्व कौतुकास्पद आहे, परंतु खरा न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा दलित आणि महिला कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीत सातत्यानं योग्य स्थान मिळेल आणि असे चित्रपट सर्रास तयार होतील, ज्यात दलित आणि महिला मुख्य पात्र असतील.
आजही मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये दलित नायक-नायिका कमीच दिसतात आणि ज्यांची सार्वजनिकरीत्या ते दलित आहेत अशी ओळख आहे, असे कलाकारही दुर्मिळ आहेत.
आज जर रोझी हयात असत्या तर त्यांना मुख्य नायिकेऐवजी सहाय्यक भूमिकाच करायला मिळाल्या असत्या, असं दिग्दर्शक कमल यांचं स्पष्ट मत आहे.
भारतात दलित विषयक सिनेमे प्रामुख्याने मराठी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतच दिसून येतात. पण तिथेही तो बहुतांशी पुरुषकेंद्रित असतो.
रोझी नावाच्या एका धाडसी दलित महिलेनं दाखवलेला मार्ग आज शतकानंतरही भारतीय चित्रपटसृष्टीनं पूर्ण केलेला नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.