अक्षय शिंदे
जालना : जालना जिल्ह्यात देखील आतापासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरवात झाली आहे. यात बदनापूर तालुक्यात अधिक भीषणता जाणवू लागली आहे. कारण जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत. तर ७ मध्यम आणि ५७ लघुप्रकल्पात केवळ २८ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणी समस्येची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागात मार्च महिन्याच्या मध्यंतरीच पाणी टंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार जिल्ह्यात देखील आता टंचाईच्या झळा जाणवायला सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडका वाढत असल्याने पाण्याच बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील ६४ मध्यम प्रकल्पांपैकी दोन मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले असून ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्पात केवळ २८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
२५ हजार नागरिकांना ट्रॅकरचा आधार
जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्यातील पाणीपातळी खालवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर फळबागा टिकवण्याचे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. तर अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या अधिक गडद असून २५ हजार नागरिकांना सद्यस्थितीला प्रशासनाकडून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पिरकल्याण प्रकल्प पडला कोरडा
दरम्यान जालना तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडल्यामुळे आजूबाजूच्या १० ते १२ गावांना देखील येणाऱ्या काळात च्या झळा सोसाव्या लागणार आहे. तर बहुतांश प्रकल्पातील पाणी पातळीत देखील झपाट्याने घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईच्या समस्या जमविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.