लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यावरून झालेल्या वादातून जोडप्याने आत्महत्या करून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडली. वसईतील नायगावमध्ये ही घटना घडली. आधी तरुणाने आत्महत्या केली. बॉयफ्रेंडच्या जाण्याने धक्का बसलेल्या तरुणानेही आत्महत्या करत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे वसईमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा (२४ वर्षे) आणि छाया गुप्ता (१७ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचे नाव आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. जितेंद्र नायगाव पूर्वेला कोल्ही गावातील आशानगरमध्ये राहत होता. तो खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर त्याची गर्लफ्रेंड छाया शिक्षण घेत होती. जितेंद्रला छायासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. पण छाया त्याला नकार देत होती. 'मी लहान आहे त्यामुळे आपण लिव्ह इनमध्ये राहणं योग्य नाही.', असं छाया त्याला सांगत होती. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे.
शनिवारी जितेंद्र छायाला भेटायला तिच्या घरी आला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. जितेंद्रला भीती वाटत होती की छाया सोबत राहिली नाही तर ती भविष्यात मला सोडून जाईल. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. तेव्हा जितेंद्रने छायाला सांगितले की, 'जर तू माझ्यासोबत राहिली नाही तर मी आत्महत्या करेन.' छायाला वाटलं जितेंद्र मस्करीत बोलत आहे त्यामुळे तिने त्याला जास्त गांभीर्याने घेतलं नाही. त्याच रात्री जितेंद्रने घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
जितेंद्रने आत्महत्या केल्यामुळे छायाला मोठा धक्का बसला. ती नैराश्येत गेली. छायाला तिच्या कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यामुळेच त्याचा जीव गेला असे तिला वाटत होते. अपराधाच्या भावनेत ती जगत होते. 'जितेंद्रचे मी ऐकले असते तर तो आज जिवंत असता.', असे तिला वाटत होते. शेवटी नैराश्येत गेलेल्या छायाने देखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.