CET Registration : 'सीईटी'साठी दीड लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
esakal April 01, 2025 06:45 PM

नामपूर- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १ ते ३ एप्रिलला सकाळी नऊ ते साडेअकरा व दुपारी दोन ते साडेचार या दोन सत्रांत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील १७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून, परीक्षेस एक लाख ५७ हजार उमेदवार बसणार आहेत.

एमबीए एमएमएस व अभियांत्रिकी या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून स्पॅम कॉलच्या माध्यमातून उमेदवारांना गैरप्रकारे पर्सेंटाईल वाढवून देण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारींची तातडीने दखल घेवून एफआयआर दाखल केला आहे. संबंधितांना अटक करण्यात आली आहे. परंतु याबाबत काही समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षेबाबत संभ्रम आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याकरीता विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशपत्राची पडताळणी क्युआर कोडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांचे फेशल रेकग्नीशन (चेहरा पडताळणी) बायोमॅट्रीक उपस्थिती घेण्यात येणार आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले असून सदर प्रक्रीयेच्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सीईटी कक्षात देखरेख करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये पर्यवेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षकांना बॉडी कॅम उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षे दरम्यान कोणताही गैरप्रकार होवू नये याची दक्षता घेण्यात येत आहे.

तसेच उमेदवाराची पडताळणी त्यांनी सोबत आणलेल्या मुळ ओळख पत्रावरुन आधार कार्ड, पॅन कार्ड पारपत्र आदींच्या आधारे करण्यासाठी गट-अ शासकीय अधिकाऱ्यांची केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विभागीय स्तरावर सहसंचालक तंत्रशिक्षण यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षे दरम्यान परीक्षा केंद्रावर काही अडचण आल्यास सीईटी कक्षाशी समन्वय साधुन तातडीने दूर करण्याकरीता जिल्हा स्तरावर शासकीय संस्थांच्या प्राचार्यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रावर भरारी पथकामार्फत सुध्दा तपासणी करण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.