Harshvardhan Sapkal On Fadnavis : मुंबई : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बीड जिल्ह्यात कायदा शिल्लक नाही. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले टोळीयुद्ध आता तुरुंगात पोहोचले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केली. (congress state president slams devendra fadnavis over law and order in state)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सरकारवर टीका केली. राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून सरकारी आशीर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. ते दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करावे लागते, ही राज्याला शरम आणणारी बाब आहे, असे सपकाळ म्हणाले.
हेही वाचा – Pending Dues : शेवटच्या दिवशी कोट्यवधींचा निधी, पण कंत्राटदारांना काही नाही…काम बंदचा इशारा
राज्यात भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. पण गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला असून महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातल्या जंगलराजसोबत होऊ लागली आहे,अशी टीकाही त्यांनी केली.
सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाल्याचे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजल इतकी वाढली आहे की आता बीडच्या तुरुंगात टोळीयुद्ध सुरु झाले आहे. त्यामुळेच बीड कारागृहातून महादेव गित्तेसह काही आरोपींना छत्रपती संभाजी नगरच्या हर्सूल कारागृहात हलवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बीडचे तुरुंगही सुरक्षित नसणे ही चिंतेची बाब आहे, सपकाळ म्हणाले.
हेही वाचा – MI VS KKR : घरच्या मैदानावर मुंबईचा पहिला विजय, पदार्पणाच्या सामन्यात अश्वनी कुमार चमकला