जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अंदाजानुसार जिल्ह्यात काही भागात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यातच जळगाव तालुक्यातील धानवड परिसरात वीज कोसळून एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचे आजोबा हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तालुक्यातील धानवड येथील अंकुश विलास राठोड (वय १५) असे वीज पडून मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात पुढील चार- पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यानुसार जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अशातच जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. यातच धानवड परिसरात पडल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
रात्री पिकांची राखण करण्यासाठी गेले असताना घडली घटना
दरम्यान अंकुश राठोड हा आजोबा शिवाजी जगराम राठोड (वय ६५) यांच्यासोबत रात्रीच्या सुमारास शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेला होता. यावेळी ढगाळ वातावरण होऊन आकाशात वीज कडाडत होत्या. तर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक विजांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यावेळी धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळून अंकुश राठोड या मुलाचा मृत्यू झाला तर आजोबा शिवाजी राठोड हे भाजले गेले आहेत.
नागरिकांनी घेतली धाव
दरम्यान घटनेबाबत आजूबाजूच्या नागरिकांना माहिती झाल्यानंतर नागरिकांनी राठोड यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र अंकुशचा मृत्यू झाला होता. तर शिवाजी राठोड हे गंभीर जखमी असून यांच्यावर उपचार सुरू आहे.