पिंपरी, ता. ३१ ः भोसरी एमआयडीसी भागात वारंवार वीज पुरवठा खंडित केल्यामुळे उद्योजकांना मार्चअखेर उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. यामुळे महावितरणने औद्योगिक भागातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.
यासंदर्भात भोर यांनी महावितरणला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, उद्योजकांना मार्च अखेर उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची घाई असते. त्यासाठी दिवस रात्र कंपन्या सुरु ठेवाव्या लागतात. या काळात वारंवार वीज खंडित केल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवस रात्र काम करण्याची तयारी ठेवून देखील वीज खंडित झाल्याने उद्योजकांना मनस्ताप सहन करावा लागला. कामगारांना बसून पगार द्यावा लागला. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने ग्राहकाची मागणी पूर्ण करता आली नाही. औद्योगिक परिसरात वीज वाहक तारा जुन्याच आहेत. अतिरिक्त वीज पुरवठा केल्यास दबाव येऊन पुरवठा खंडित होतो. त्याची दुरुस्ती वेळेत केली जात नाही. त्याचबरोबर वीज बिले भरण्यासाठी उद्योजकांना सवलत दिली जात नाही. टप्पे-टप्पे करून देखील वीज भरण्यास मुभा मिळत नाही. वेळेत वीज बिल न भरल्यास दंड आकारला जातो. उद्योजकांप्रती महावितरण सहकार्याची भूमिका घेत नाही. त्यामुळे उद्योजकांनी महावितरणवर नाराजी व्यक्त केली आहे. ठोस उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करावा.