फैय्याज शेख
मोखाडा (पालघर) : नाशिक- मोखाडा- जव्हार मार्गावर असलेल्या वाघ नदीत आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. गोणीमध्ये बांधून फेकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून सदर तरुणीची हत्या करून नदीत फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील नाशिक- मोखाडा- जव्हार या मार्गावरील घाटकरपाडा येथील वाघ नदीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा मृतदेह हा एका सुतळी गोणीत भरून वाघ नदीच्या पुलावरून खाली फेकून दिला आहे. परिसरातील नागरिकांना हा मृतदेह आढळून आल्यानंतर याबाबत ना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.
हत्या केल्याचा संशय
सदर तरूणीला गळफास देऊन तिची हत्या करून या ठिकाणी फेकण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे असून अंगावर पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लैगिज असून याबाबत मोखाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोल व कर्मचारी तपास करत आहेत. अद्याप तरूणीची ओळख पटली नसून या मृतदेहाची प्रथामिक तपासणी करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.
मोखाडा तालुक्यात खळबळ
दरम्यान मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघ नदी जवळ एका अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेतील मृत तरुणी हि राहणार कुठली, नाव याची काहीही माहिती अद्याप पोलिसांकडे नाही. या अनुषंगाने प्रथम सदर तरुणी कोण याचा तपास पोलीस घेत आहेत. यानंतर तिची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास केला जाणार आहे.