'रत्नागिरीतील हिंदू-मुस्लिम ऐक्य आदर्शवत, सर्वांनी हे टिकवून ठेवले पाहिजे'; मंत्री उदय सामंत यांचे आवाहन
esakal April 01, 2025 07:45 PM

"आज अफवा पसरविल्या जातात, त्यावर आपण सर्व जण विश्वास ठेवतात. मात्र, त्यातील सत्यता तपासली जात नाही."

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात हिंदू-मुस्लिम ऐक्य (Hindu-Muslim Unity) कसे आहे, हे आपण गणेशत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान पाहिले आहे. गणेश मिरवणुकीचे स्वागत मुस्लिम धर्मीयांकडून (Muslim Community) केले जाते. ईद दिवशी हिंदू धर्मीय त्यांना शुभेच्छा देतात. हे हिंदू-मुस्लिम ऐक्य सर्वांनी टिकवून ठेवले पाहिजे. मी परंपरा जपणारा लोकप्रतिनिधी आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून ईदच्या शुभेच्छा देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री (Uday Samant) यांनी केले.

शनिवारी (ता. २९) शहरातील जयेश मंगल पार्क येथे उदय सामंत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी, डॉ. अलिमियाँ परकार, डॉ. मतिन परकार, उद्योजक नजिर नाईक, डॉ. म्हस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, अजिम चिकटे, अल्ताफ संगमेश्वरी आदी उपस्थित होते.

यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले, आज अफवा पसरविल्या जातात, त्यावर आपण सर्व जण विश्वास ठेवतात. मात्र, त्यातील सत्यता तपासली जात नाही. कोरोना काळात आपण शहरातील परकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. त्यावेळी डॉ. परकार हे आलेला रुग्ण हिंदू आहे की मुस्लिम हे पाहत नव्हते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.