वक्फ सुधारणा विधेयकावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. वक्फ सुधारणा विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करुन उद्धव ठाकरे गटाला सवाल केला. “बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?” त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
“देवेंद्र जी,वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची!विषय राहुल गांधींचा, त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे?बोला ।” असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी X वर पोस्ट करुन केला.
‘आमची भूमिका शेवटच्या क्षणी दिसेल’
उद्धव ठाकरे गटाचा या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “आमची ठरलेली भूमिका तुम्हाला शेवटच्या क्षणी दिसेल. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावर करायच्या असतात, त्या आम्ही करु'”
‘हा मूर्खपणा’
“या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे फडणवीस सांगू शकतील का?. इतर सुधारणाविधेयक असतात, तसं हे बिल आहे. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर कब्जा मिळवणं काही उद्योगपतींना सोप जावं, त्यासाठी या बिलाच प्रायोजन दिसतय. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्व आणि विज्ञानवाद यांना सपोर्ट केला. फडणवीस किंवा त्यांचे बगल बच्चे हे वक्फ बिलाच्या निमित्ताने बांग देतात हा मूर्खपणा आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.