बुलढाणा : बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात एक १७ वर्षीय मुलगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली त्यावेळी बालविवाहची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात खामगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी (वय १७, रा. मलकापूर) हीचं आरोपी (अजय वय २५, रा. मलकापूर) याच्यासोबत बालविवाह लावण्यात आला. मुलीकडील काही लोकांनी कट रचून हा विवाह घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
हा प्रकार १९ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत घडला. पीडित मुलगी गर्भवती झाली आणि तिला ३१ मार्च २०२५ रोजी प्रसूतीसाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती बिघडल्यानं तिला अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे सिझेरिन प्रसूतीद्वारे तिने मुलाला जन्म दिला.
उपनिरीक्षक राजेश गोमासे यांनी पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३७६(२) (N) सह पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावं, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
भारतात बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ अंतर्गत मुलाने वयाची २१ वर्ष पूर्ण केली नसतील आणि स्त्रीने वयाची १८ वर्ष पूर्ण केली नसतील तर बालविवाह केला जात नाही. हा कायदा असंही घोषित करतो, की कायदेशीर वयोमर्यादेपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होणारं कोणतंही लग्न रद्दबातल आहे.